नाशिक : सुरक्षित वाहन चालविणे, अनावश्यक हॉर्न वाजवू नये व रस्ता सुरक्षा या उद्देशाने प्रादेशिक परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व विविध शासकीय कार्यालये यांच्या संयुक्त रविवारी (दि.१८) आयोजित करण्यात आलेल्या महावॉकेथॉनला नाशिकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला़ क़ का़ वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. एच. पगारे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर या महावॉकेथॉनला प्रारंभ झाला़
वाहनचालकांनी वाहन चालविताना घ्यावयाची काळजी तसेच सुरक्षित वाहने चालविणे याबाबत जनजागृती करण्यासाठी या महावॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. दोन किलोमीटर अंतराच्या या वॉकेथॉनपमध्ये सहभागी घेतलेले अधिकारी व नागरिकांच्या हातात ‘भवितव्य तुमच्या हाती का गमवावे प्राण अपघाती’, ‘वेग कमी जीवनाची हमी’, ‘जेव्हा चालवू वाहन तेव्हा करू नियमांचे पालन’, ‘डोके आहे सर्वात नाजूक हेल्मेट लावून व्हा जागरूक’ असे सुरक्षिततेचे संदेश देणारे फलक होते.
महाराष्ट्रातील सुमारे दोनशे ठिकाणी रविवारी या महावॉकेथॉनचे आयोजन केले होते़ वाहतूक सुरक्षिततेविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ नाशिक शहरातील क़ का़ वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, मोतीवाला होमिओपॅथिक कॉलेज, सपकाळ नॉलेज हब या ठिकाणी वॉकेथॉनचे कार्यक्रम झाले़ यानंतर उपस्थितांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य केशव नांदूरकर, अजिंक्य जोशी, सुरेंद्र कंकरेजा, एस. ए. तांबे, मोटार वाहन निरीक्षक हेमंत हेमाडे, सिद्धार्थ घुले, निर्मला वसावे, योगेश सरोदे, विनोद साळवी, हेमंत देशमुख, पल्लवी दौंड, शब्बीर शेख, संदीप तुरकाने, संभाजी पाटील, संजय भोये, अनुप वाघ, सुनील शेवरे, जितेंद्र देसाई, हरी अहिरे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.वाहन चालवितांना सुरक्षितता आवश्यकअनावश्यक ठिकाणी हॉर्न वाजवू नये, सुरक्षित वाहन चालविणे तसेच वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होणार नाही याची वाहनचालकाने दखल घेणे गरजेचे आहे. वेगमर्यादेचे पालन केल्यास अपघातावर नियंत्रण मिळविता येते़ रस्ता सुरक्षा व सुरक्षित वाहन चालविणे याबाबत नागरिकांचे जागृती व्हावी, यासाठी या महावॉकेथॉनचे आयोजन केले होते.- भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक