----
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुधवारी दुपारी १२ वाजेपासून जिल्ह्यात पुढील बारा दिवस कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे मंगळवारी (दि.११) सकाळी नागरिकांची जीवनावश्यक वस्तू, फळे भाजीपाला खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती. काही ठिकाणी पोलिसांनी याच बाबीची संधी साधत १० वाजेपासून नाकाबंदीच्या पॉइंटवर लोकांची अडवणूक करत जाब विचारून दंड वसूल केला. दुपारी एक वाजेनंतर मात्र पोलिसांचे हे ‘नाके’ सायंकाळपर्यंत ओस पडलेले पहावयास मिळाले.
अंशतः लॉकडाऊनमध्येही नागरिकांना ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी प्रशासनाकडून बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली आहे. ही मुभा बुधवारी (दि. १२) ११ वाजता संपुष्टात येणार आहे; मात्र पोलिसांनी मंगळवारी सकाळी उडालेल्या झुंबडचा वेगळाच फायदा उचलण्याचा प्रयत्न करत जणू लॉकडाऊन मंगळवारीच सकाळी लागू झाल्याच्या आविर्भावात कर्तव्य ‘कठोर’ वागण्यास सुरुवात केली. पंचवटी बाजार समिती, रविवार कारंजा, भद्रकाली, दहीपूल, दूधबाजार आदी भागात खरेदीसाठी आलेले नागरिक परतत असताना सारडा सर्कल येथील पॉइंटवर त्यांना ११ वाजेच्या अगोदरच पोलिसांकडून अडविण्यास सुरुवात झाली होती. ‘कुठे गेले होते? किराणा, भाजीपाला आणायला दोन जण लागतात का, एका मोटारसायकलवरून दोघे प्रवास का, करत आहेत, अशा अनेकविध प्रश्नांची सरबत्ती करत पाचशे रुपये दंडाची पावती फाडण्यासाठी दबाव आणला जात होता. यावेळी नागरिकांना प्रश्न एकच पडला तो म्हणजे पोलीस ११ वाजेच्या अगोदरच का अडवणूक करत आहेत. भोळ्याभाबड्या जनतेला या प्रश्नाचे उत्तर तर मिळणे दूर मात्र दंडुक्याचा प्रसाद घेत घराची वाट धरावी लागली. विशेष म्हणजे या ठिकाणी ‘कर्तव्य’ बजावणारे फौजदार ‘साहेब’ तर जणू एखाद्या हिंदी चित्रपटातील ‘दबंग’ पोलीस अधिकाऱ्याप्रमाणेच वागताना दिसून आले. त्यांच्या रोषाचा विनाकारण नागरिकांना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे सामना करावा लागत होता. हे ''साहेब'' एका दुचाकीने दोघे प्रवास करणाऱ्या तरुणांना थांबवून ''चल दोन्ही हात पुढे कर...'' असे सांगून दंडुक्याचा ''प्रसाद'' देताना दिसून आले. त्यामुळे या साहेबांच्या कारवाईविषयी तर तीव्र नाराजी यावेळी अनेकांनी व्यक्त केली. अगोदरच कोरोनाने त्रासलेल्या नाशिककरांना पोलिसांच्या अशा नियमबाह्य कारवाईचा सामना करावा लागल्याने या कारवाईच्या नावाखालील अतिरेक लॉकडाऊन काळात वाढायला नको, एवढीच माफक अपेक्षा नाशिककर व्यक्त करत आहेत.
______
नाकाबंदीचा फोटो nsk वर सेंड केला आहे.