नाशिक : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चुकून पूजा साहित्याच्या निर्माल्यात हरवलेली मौल्यवान रुबी डायमंड रिंग शोधण्यात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनच्या टीमला यश आले आहे.
त्याचे झाले असे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी येथील उद्योजक आणि खाबिया ग्रुपचे संचालक प्रवीण खाबिया आणि सपना खाबिया या दांपत्याने विधिवत पूजा करून सकाळी पूजेचे साहित्य बाजूला काढून निर्माल्य मनपाच्या घंटागाडीत दिलं. या कचऱ्यामध्ये 31 वर्षापूर्वीची प्रवीण खाबिया आणि सपना खाबिया यांच्या एंगेजमेंटची मौल्यवान रिंग रुबी डायमंड गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे सपना खाबिया या सणासुदीच्या दिवशी बेचैन होत्या. त्यांना रडू आवरेनासे झाले. त्यातून काहीतरी मार्ग काढावा यासाठी प्रवीण खाबिया यांनी पत्नीचे मन समाधान करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेशी संपर्क साधला. प्रवीण खाबिया यांनी महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांना दूरध्वनी वरून घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक आणि प्रमुख डॉ. आवेश पलोड यांना ही घटना सांगितली. ही माहिती नाशिक आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांना देखील दिली.
करंजकर यांच्या मार्गदर्शनाने पलोड यांनी सर्व सूत्र हलविली आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी मिशन रिंग मोहिमेत सक्रिय झाले. मिशन रिंग यशस्वी करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक बागुल आणि त्यांची सर्व टीम कामाला लागली. यामध्ये वॉटर वेस्टचे चेतन बोरा आणि त्यांचे सर्व सहकारी, वाहन चालक, निरीक्षक, हे देखील मिशन रिंग मोहिमेत सहभागी होऊन सणाच्या दिवशी हरविलेली रुबी डायमंड रिंग सुमारे सहा तासांच्या यशस्वी प्रयत्नांनंतर शोधण्यात यशस्वी झाले. सकाळी 11 वाजता हरवलेली रिंग सायंकाळी 6 वाजता मिळाली. प्रवीण खाबिया यांना डायमंडची रिंग सापडल्याची दूरध्वनीवरून माहिती देताच खाबिया परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला. खाबिया परिवारातर्फे मनपाचे आवेश पलोड, योगेश कमोद यांचा सत्कार करण्यात आला.