नाशिक : गत दोन महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून कोल्हापूर, नागपूर आणि इंदूरसाठी सुरू करण्यात आलेल्या स्लिपर कोच शिवशाही बसला जादा तिकीट दर, दीर्घकाळ प्रवास आदी विविध कारणांमुळे प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रिकाम्या बसमध्ये राजेशाही थाटाने प्रवास करण्याची संधी मिळत असून, ते खºया अर्थाने शाही प्रवासाचा अनुभव घेत असल्यासारखी परिस्थिती पहायला मिळत आहे. राज्य परिवहन महामंडळाने लांब पल्ल्याच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी नाशिकहून नागपूर, कोल्हापूर व इंदूरसाठी वातानुकूलित स्लिपर कोच शिवशाही बस सुरू केल्या आहेत. या बसचे भाडे खासगी बसच्या तुलनेत २०० ते ८०० रुपयांनी जास्त असल्याने व बस प्रवासात मोठ्या प्रमाणात थांबे घेत असल्याने प्रवाशांनी या बसकडे पाठ फिरवली आहे. खासगी बसचे दर कमी असून, बस डायरेक जात असल्याने परिवहन महामंडळाच्या बसच्या तुलनेत कमी वेळेत पोहोचते. तेच परिवहन महामंडळाची बस मधले सर्व थांबे घेत असल्याने प्रवासाला वेळ लागत आहे. या तिन्ही ठिकाणी दररोज एक बस जात असून त्यापैकी कोल्हापूरसाठी सायंकाळी ८ वाजता, इंदूर व नागपूर बसची निघण्याची वेळ सायंकाळी ७.१५ ही आहे. नागपूरचे नाशिकहून अंतर ७५० किलोमीटर असून येऊन-जाऊन हा प्रवास १५०० किमीचा होतो. १० लिटर इंधनात ४.३ चे अॅव्हरेज पकडल्यास इंधन, चालकाचा पगार, टोल आदी खर्च धरून या फेºया तोट्यातच जात आहेत. एसी शिवशाही बससेवांचा खर्चही उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. अशीच गत इंदूर, कोल्हापूरचीदेखील आहे. हा संचित तोटा वाढत गेल्यास परिवहन महामंडळाचे गणित बिघडू शकते हे लक्षात घेऊन महामंडळाने काही बाबतीत बदल करणे गरजेचे असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.बसमधील सुविधास्लिपर कोच शिवशाही बस अधिकतर रात्रीच्या वेळी धावतात. या वातानुकूलित बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे आणि आगप्रतिबंधक यंत्रणाही आहे. भ्रमणध्वनी चार्जिंग, मोफत इंटरनेटची सुविधा आहे. प्रवाशांना ब्लँकेट, उशी मोफत मिळणार आहे. झोपण्याची व्यवस्था असलेल्या या बसमध्ये ३० आसन व्यवस्था आहे.
नाशिकच्या स्लिपर शिवशाहीतून ‘राजेशाही’ प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:45 AM