नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, बुधवारी (दि. १७) सत्ताधारी पिंगळे गटाने हरसूल येथे सहविचार सभा आयोजित करून ‘आपला पॅनल’ची घोषणा केली. आमदार हिरामण खोसकर यांच्याहस्ते प्रचाराचा नारळ फोडून विरोधकांवर आघाडी घेतली आहे. यावेळी पेठ, हरसूलवासियांनी विद्यमान सभापती देवीदास पिंगळे यांना बिरसा मुंडा यांची मूर्ती भेट देत आपला पॅनलच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे सचिव यशवंत गिरी यांनी राज्यातील १५ बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी पिंगळे आणि चुंभळे गटात रस्सीखेच पाहायला मिळते. यंदा सत्ताधारी पिंगळे गटाने बुधवारी (दि. १७) हरसूल येथे पेठ - हरसूल येथील विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद व ग्रामपंचायत सदस्यांची सहविचार सभा घेत आघाडी घेतली. यावेळी सभापती देविदास पिंगळे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज करत असताना विविध विकासकामे केली. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत नाशिकरोड, त्र्यंबक, हरसूल उपबाजार सुरू केला. यावेळी पेठ - हरसूल सदस्य व सभासदांनी एकमताने आपला पॅनलच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे जाहीर केले. या सभेला आमदार हिरामण खोसकर, सभापती देविदास पिंगळे, संचालक संपतराव सकाळे, बहिरू पाटील मुळाणे, पुंडलिक साबळे, भिका पाटील महाले, मनोहर चौधरी, भास्करराव गावित, नामदेव हलकांदर, समाधान बोडके, मुख्तार सैय्यद, देविदास जाधव, मिथुन राऊत, दामोधर राऊत, रामदास वाघेरे, अरुण कासिद, हरिभाऊ बोडके, बाळासाहेब म्हस्के, विलास कड, विलास कांडेकर, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, रवींद्र भोये, संजय तुंगार, विश्वास नागरे, विनायक माळेकर, युवराज कोठुळे, विष्णुपंत म्हैसधुणे, नामदेव गायकर, अर्जुन मौले, मधुकर पाखणे, मंगळू निम्बारे, गोकुळ बट्टासे, आदी उपस्थित होते. बहिरू मुळाणे यांनी सूत्रसंचालन केले, तर समाधान बोडके यांनी आभार मानले.
दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खंबाळे येथेही गुरूवारी (दि. १८) सहविचार सभा घेण्यात आली. काबाडकष्टाने पिकवलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देणारी शेतकऱ्यांची वास्तू टिकवायची असेल तर देवीदास पिंगळे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे प्रतिपादन आमदार हिरामण खोसकर यांनी यावेळी केले.