इगतपुरी : लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी कामायनी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या फोनमुळे कामायनी एक्स्प्रेस इगतपुरी रेल्वेस्थानकात थांबवून गाडीतील प्रवाशांच्या सामानाची झडती घेण्यात आली; मात्र कोणतीही बॉम्बसदृश वस्तू आढळून न आल्याने अखेर सव्वासहा वाजता गाडी पुढे वाराणसीला सोडण्यात आली.मुंबईहून वाराणसीकडे जाणाऱ्या कामायनी एक्स्प्रेसच्या एस-४ या बोगीत बॉम्ब असल्याचा फोन अजय यादव (३४) या इसमाने ठाणे ग्रामीण पोलिसांना केला. ठाणे ग्रामीण पोलिसांनी याची तत्काळ माहिती कल्याण रेल्वे विभागाला कळविली. कल्याण रेल्वे विभागाने याची गंभीर दखल घेत इगतपुरी येथील लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक एस.एस. बर्वे व स्टेशन प्रबंधक प्रेमचंद आर्या यांच्या पथकाने रेल्वेस्थानकात धाव घेऊन ३.१५ मिनिटांनी आलेल्या कामायनी एक्स्प्रेसला रेल्वेस्थानकात थांबवून ठेवत एस-४ व इतर बोगीतील सामानाची कसून झडती घेतली; मात्र काहीच मिळून न आल्याने त्यांनी या घटनेची खबर नाशिक येथील बॉम्ब शोध पथकाला कळविली. बॉम्ब शोध पथक व डॉग स्कॉड पथकाने तातडीने रेल्वेस्थानकात येऊन एस-४ बोगीमधील व इतर बोगीतील सर्व प्रवाशांना खाली उतरवून पूर्ण बोगीतील सामानाची झडती घेतली. अखेर गाडी तीन तासानंतर वाराणसीकडे निघाली.नाशिक येथून आलेल्या एटीएस व बॉम्ब शोध पथकातील पोलीस निरीक्षक विजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ दुसाने, सुनील कासारले, विजय निकम, हवालदार रोहिदास लोंढे, अनिल चव्हाण, पी.एन. नवले, पी.एन. बेंडकुळे, मोहन शेटे व नाशिक पथकाचा डॉग स्पाइक व कल्याण रेल्वे पथकाचा डॉग बाजी यांच्यासह पथकाने पूर्ण गाडीची झडती घेतली. बॉम्बसदृश कोणतीही वस्तू आढळून न आल्याने प्रवाशांसह पथकाने नि:श्वास सोडला.
कामायनी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 1:25 AM