नाशिक : पावसाच्या बरसत्या सरींच्या साथीने गायक पंडित सत्यशील देशपांडे व गायक योगेश देवळे यांच्या शास्त्रीय गायनाच्या सुमधुर स्वरांनी नाशिककर चिंब झाले. कुसुमाग्रस स्मारकात तरंगिणी प्रतिष्ठान, कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि संवादीतर्फे आयोजित ‘श्यामरंग’ संगीत समारोह मध्ये योगेश देवळे यांनी राग मुधवंती सादर करताना ध्रुतलयीतील बडाख्याल मध्ये व विलंबती एकतालमध्ये ‘ये हो मेरे साई’ तसेच छोटा ख्यालमधील ‘सून पिया अरज अब मोरी’ आदी बदिशींच्या गायनातून रसिकांना मंत्रमुग्ध केले, तर पंडित सत्यशील देशपांडे यांनी राग जयजयवंती विलंबित एकताल सादर करताना रसिकांची मने जिंकली. त्यांना संवादिनीवर आनंद अत्रे, तबल्यावर नितीन वारे, तानपुऱ्यावर अभिषेक सिंग व अजिंक्य जोशी यांनी संगीतसाथ केली. दरम्यान, श्यामरंग या दोन दिवसीय संगीत समारोहाच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली असतानाही नाशिककर रसिकांनी या संगीत मैफलीचा आनंद घेण्यासाठी गर्दी केली होती. तरंगिणी प्रतिष्ठानने लोकेश शौनक अभिषेकी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन श्रृत कीर्ती कर्वे यांनी केले.
‘श्यामरंग’च्या मधूर स्वरांनी रसिक चिंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:23 AM