नाशिक : आपापल्या गावी परतण्यासाठी रेल्वेला आवश्यक असलेला विशेष पास जिल्हाधिकारी कार्यालयातून वितरित केला जात असल्याची अफवा पसरल्याने असंख्य परप्रांतीय मजूर सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जमा झाल्याने प्रशासनाचीही धावपळ उडाली.जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या शेल्टरमधील परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, गेल्या दोन दिवसांत दोन विशेष रेल्वेगाड्यांनी सुमारे आठशे मजुरांना लखनऊ आणि भोपाळ येथे रवाना करण्यात आले आहे. मजुरांना परत पाठविण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावरून संपूर्ण माहिती असलेला अर्ज भरावा लागतो. त्यानुसार संबंधित मजुराला रेल्वेने पाठविण्याची प्रक्रिया केली जाते. परंतु वेबसाइट हॅँग झाल्यामुळे किंवा गती कमी झाल्यामुळे अनेकांची आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. त्यामुळे या मजुरांना आपल्याला गावाकडे जाण्यास अडचण निर्माण होऊ शकते अशी भीती निर्माण झाली होती.दरम्यान, ज्यांचे आॅनलाइन अर्ज अद्याप पूर्ण होऊ शकले नाहीत अशांना जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वेचा विशेष पास दिला जात असल्याची अफवा पसरल्याने हजारोंच्या संख्येने परप्रारंतीय मजूर शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जमा झाले होते. काही मजुरांनी आॅनलाइन भरलेले अर्जांची प्रिंटआउटसोबत आणली होती. त्याला मान्यता देण्याची मागणी या मजुरांनी लावून धरली त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पास मिळण्याच्या अफवेने मजुरांची धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 1:38 AM