नाशिक : शहरासह सर्वत्रच रेमडेसिविरची टंचाई जाणवत असली, तरी राज्यभरातच अशी अवस्था आहे. त्यामुळे रेमडेसिविर मिळविण्यासाठी सर्वच रुग्णांच्या नातेवाइकांची परजिल्ह्यात धावपळ सुरू आहे. नाशिकमध्येही टंचाई असताना, उत्तर महाराष्ट्रातूनच नव्हे, तर मुंबई, पालघर आणि नजीकच्या गुजरातमधूनही चौकशी केली जात आहे. कोरोनाची ही दुसरी लाट असल्याचे मानले जात आहे. ही लाट इतकी भयंकर आहे की, त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात बाधितांसाठी साध्या खाटाही मिळत नाही. नाशिकमध्ये महापालिका आणि अन्य शासकीय यंत्रणांनी काहीही दावे केले, तरी साधे बेडही मिळणे दुर्मीळ झाले आहे. ओळखीपाळखी आणि अधिकारी नेत्यांच्या संपर्काशिवाय बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यातच कोरोना रुग्णावर उपचार म्हणून रेमडेसिविर इंजेक्शन्सचा वापर केला जात असून, गेल्या काही दिवसांपासून या इंजेक्शन्सचीही टंचाई जाणवत आहे. नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णांच्या नातेवाइकांचे हाल झाले. महापालिका ही निमशासकीय संस्था असून, रेमडेसिविर इंजेक्शनअभावी तीन दिवस काढावे लागले. खासगी रुग्णालयांची अवस्था यापेक्षा बिकट आहे. रेमडेसिविरचा काळाबाजार शिगेला पोहोचल्याने, आता जिल्हा प्रशासनाने सूत्र हाती घेऊन त्याचे थेट रुग्णालयांना वितरण सुरू केले असले, तरी अद्यापही पुरवठा मुबलक झाल्याशिवाय उपयोग नाही. नाशिक शहराला सहा ते साडेसहा इंजेक्शन दररोज लागतात, असे सांगितले जाते. मात्र, पुरवठाच होत नसल्याने रुग्णालयांना तरी पुरवठा कसा हेाणार, असा प्रश्न आहे.
नाशिकमध्येच नव्हे, तर राज्यात बहुतांश ठिकाणी अशीच स्थिती असल्याने, रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या शोधासाठी विविध ठिकाणी धाव घेत आहेत. जळगाव, धुळे, अहमदनगर इतकेच नव्हे, तर मुंबई, पालघरसारख्या ठिकाणहून नागरिक संपर्क साधून इंजेक्शन्सचा शोध घेत आहेत.
इन्फाे...
पाच दहा हजार जास्त घ्या पण...
रेमडेसिविर हे कोराेनाबाधितांवर उपचारासाठी प्रभावी आहे किंवा नाही, याबाबत वेगवेगळी मते आहेत. मात्र, सध्या तरी उपचारासाठी हे इंजेक्शन वापरले जात आहे. सुमारे साडेपाच हजार रुपयांना एक इंजेक्शन असले, तरी त्यासाठी नातेवाईक वाट्टेल ती रक्कम मेाजायला तयार होतात. एक इंजेक्शन घेण्यासाठी मुंबई, पालघर, जळगावमधून खास गाडी घेऊन इंजेक्शन नेण्याची तयारी दर्शवत आहेत. इतकी या इंजेक्शन्सची निकड भासत आहे.
इन्फो...
नाशिक महापालिकेने २० हजार रेमडेसिविर इंजेक्शन मागविल्याचे वृत्त सोशल मीडियावर झळकल्यानंतर, एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला थेट बडोदा येथून परिचिताने फोन केला आणि दोन इंजेक्शनसाठी गाडी पाठविण्याची तयारी दर्शवली.