मालेगाव तालुक्यापासून नजीकच असलेल्या दाभाडी ग्रामीण रुग्णालयात २२ मार्च ते ५ एप्रिल या दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये जवळपास ५७० नागरिकांना कोवॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला. मात्र आता चाळीस दिवस उलटल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी कोवॅक्सिन उपलब्ध होत नसल्याने नागरिक गोंधळात पडले आहेत. सदर लस ही तालुक्यात दुसऱ्या ठिकाणी उपलब्ध होईल म्हणून नागरिक भटकंतीसुद्धा करीत आहेत मात्र सध्याच्या परिस्थितीला तालुक्यात कुठेच ही लस उपलब्ध नसल्याने लसीचा दुसरा डोस कसा घ्यावा हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दाभाडी ग्रामीण रुग्णालय हे मालेगाव तालुक्यापासून नजीकच असल्याने शहरातील व ग्रामीण भागातील अनेक लोकांनी येथून कोवॅक्सिन लस घेतली आहे. विशेषतः पहिल्या टप्प्यात वयोवृद्ध व फ्रन्टलाइन वर्कर्स यांना ही लस देण्यात आलेली आहे. आता ही लस उपलब्ध नसल्याने कोणाकडे जावे असा संभ्रम निर्माण झाला आहे.
इन्फो
नागरिकांची भटकंती
मालेगाव तालुक्यात सद्य:स्थितीला कुठेही कोवॅक्सिन लस उपलब्ध नाही. मालेगाव तालुक्याच्या जवळील नामपूर, सटाणा, चांदवड या ठिकाणी ही लस उपलब्ध असल्याचे समजले म्हणून नागरिक त्या ठिकाणी जाऊन लस घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सद्य:स्थितीला तिकडे ही लस उपलब्ध नाही. या तुटवड्यामुळे विनाकारण नागरिकांची फरपट होत आहे
कोट....
दाभाडी ग्रामीण रुग्णालयातून कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला होता. आता दुसरा डोस घेण्यासाठीचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र सदर लस ही दाभाडीप्रमाणे तालुक्यात कुठेच उपलब्ध होत नसल्याने दुसरा डोस कसा घ्यावा असा प्रश्न पडला आहे.
- जगदीश खैरनार, दाभाडी