शैलेश कर्पे/नितीन शिंदे सिन्नर/ठाणगाव (जि. नाशिक) : मांजराच्या पाठीमागे लागलेला बिबट्या मांजरापाठोपाठ विहिरीत कोसळला. सावज असलेली मांजर आणि शिकारी असलेला बिबट्या रात्रभर विहिरीतील पाण्यात पोहून थकले. विहिरीत असलेल्या लोखंडी अँगलवर पोहून थकलेला बिबट्या विसावला आणि त्याच्या पाठकुळी मांजर बसली. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्या आणि मांजर या दोघांचे जीव वाचविल्याची घटना सिन्नर तालुक्यातील टेंभूरवाडी (आशापूर) येथे घडली.
सिन्नर तालुक्यातील टेंभूरवाडी (आशापूर) येथे विहिरीच्या पाण्यात पडलेल्या बिबट्याने लोखंडी अँगलचा आधार घेतला आणि बिबट्याच्या पाठकुळी मांजराने ठाण मांडून जीव वाचविला.
शेवटी वाघाची मावशीच... बिबट्या व मांजर दोघेही मांजरकुळातील प्राणी. दोघेही चपळ. शिकार करताना मांजर व बिबट्या विहिरीत पडले. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू होणार असे असताना दोघांनीही पोहत रात्र काढली. लोखंडी अँगलवर बिबट्या विसावल्यानंतर त्याने मावशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मांजराचाही जीव वाचवला.
अशी सुटका..दोरखंडाच्या साहाय्याने विहिरीत एक जाळी सोडून अगोदर मांजराची सुटका केली. त्याने वर काढताच धूम ठोकली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा विहिरीत सोडल्यानंतर बिबट्याने पिंजऱ्यात उडी घेतली आणि दरवाजा बंद झाला. त्यानंतर अडीच ते तीन वर्षांच्या मादीला उपचारांसाठी सिन्नरजवळील मोहदरी वनउद्यानात आणण्यात आले.
त्याचे झाले असे... : पाठलाग महागात...
सिन्नर तालुक्यातील टेंभूरवाडी (आशापूर) येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास सावजाचा (मांजराचा) पाठलाग करीत असताना बिबट्या सुमारे ७० फूट खोल विहिरीत पडला. विहिरीत सुमारे ५० फूट पाणी होते. त्यामुळे मांजर आणि बिबट्या दोघेही विहिरीत रात्रभर पोहत आपला जीव वाचवत राहिले.
विहिरीत विद्युतपंप ठेवण्यासाठी बसविण्यात आलेल्या लोखंडी अँगलचा बिबट्याने आधार घेतला. रात्रभर पोहून थकल्यानंतर मांजरानेही अँगलकडे धाव घेतली. त्यानंतर जिवाची पर्वा न करता मांजराने बिबट्याच्या पाठकुळी बैठक मारली. दोघांचाही जीव धोक्यात असल्याने बिबट्या शांत बसला.
रहिवाशांना विहिरीतून बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज ऐकू आला. त्यांनी विहिरीत डोकावून पहिल्यानंतर त्यांना लोखंडी अँगलवर बिबट्या बसलेला दिसला. त्यांनी ताबडतोब वनविभागाला माहिती दिली. सिन्नरच्या वनपरिक्षेत्र पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले.