मनमाड : पालिकेच्या वतीने शहरातील घरपट्टी, पाणीपट्टी, गाळेभाडे वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्यात आली. थकीत रकमेपैकी दोन लाख सतरा हजार रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली. पालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धूसर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या पथकाने शहराच्या विविध भागात जाऊन कर वसुली करण्यात आली. पालिकेच्या मालकीच्या इंदिरा गांधी शॉपिंग सेंटर व आययूडीपीमधील व्यापारी संकुलातील प्रत्येकी दोन असे एकूण चार गाळे सील करण्यात आले. चंदनवाडी भागातील पाणीपट्टी थकबाकी असलेल्या दोन घरांच्या नळजोडण्या तोडण्यात आल्या. शहरातील नांदगाव रोडवरील पाम व्हू हॉटेल चालकास थकबाकी भरण्याची नोटीस देण्यात आली. या मोहिमेत कर निरीक्षक अशोक पाईक, लेखापाल नाना जाधव, शरद बोडके, राजेंद्र पाटील, कैलास पाटील, पृथ्वीराज कोळगे, सुभाष केदारे, सुधाकर भाबड, संतोष सोनवणे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. कर वसुलीसाठी पालिकेकडून सदरची मोहीम यापुढेही राबविण्यात येणार असून, करदात्यांनी कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी केले.
कर वसुलीसाठी पालिकेची धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 2:25 PM