नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून कोणतीही थकबाकी नसल्याचे व जिल्हा परिषदेचे मक्तेदार नसल्याचा दाखला मिळविण्यासाठी आजी-माजी पदाधिकारी व सदस्यांची धावपळ सुरू झाली आहे. सोमवारी (दि.६) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने शनिवारीच जिल्हा परिषदेतून तब्बल ८० ते ८५ इच्छुकांनी ना हरकत दाखले नेल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग एक, दोन व तीनकडून संबंधित इच्छुक उमेदवार मक्तेदार नसल्याचा ना हरकत दाखला, तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून जिल्हा परिषदेची संबंधिताकडे कोणतीही थकबाकी नसल्याचा ना हरकत दाखला देण्यात येतो. तो दाखला उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारी अर्जासोबत जोडावा लागतो. ना हरकत दाखले घेण्यासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांचे पती रत्नाकर चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्या पत्नी प्रिया वडजे, सभापती केदा अहेर यांच्या पत्नी धनश्री अहेर यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार, माजी उपाध्यक्ष मधुकर हिरे, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती प्रवीण पवार, कलावती हरिश्चंद्र चव्हाण, उदय जाधव, यतिन पगार, गोरख बोडके, हेमलता श्याम गावित, भास्कर गावित, संजय सोनवणे, वर्षा प्रशांत बच्छाव, राहुल कोतवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे, सुरेखा नरेंद्र दराडे, शोभा सुहास कांदे, साहू बनकर, मंदाकिनी दिलीप बनकर, भास्कर बनकर, माजी सभापती हिरामण खोसकर, विनायक माळेकर, अपर्णा वामन खोसकर, मिथुन राऊत, संजय तुंगार, अजिंक्य गोडसे, समीर चव्हाण यांच्यासह ८० जणांचा समावेश आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस आहे. त्यामुळे ना हरकत दाखले घेण्यासाठी सोमवारीसुद्धा जिल्हा परिषदेत गर्दी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
ना हरकत दाखल्यांसाठी सदस्यांची धावपळ
By admin | Published: February 06, 2017 12:10 AM