लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या कारभारावर तीव्र नाराजी व तितकाच संताप पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करून अधिकाऱ्यांना चांगले कामकाज करण्याची व निधी वेळेत खर्चाची तंबी भरल्यामुळे सोमवारी जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुखांची धावपळ उडाली. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह प्रमुख अधिका-यांनी सकाळपासूनच बैठकांवर जोर देत वेळेत निधी कसा खर्च होईल यासाठी प्रयत्न चालविले.
पालकमंत्री म्हणून नियुक्ती होताच, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जवळपास पाच सव्वापाच वर्षांनंतर पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. दिवसभर चाललेल्या या बैठकीपूर्वी भुजबळ यांनी आपल्यापरीने जिल्ह्यातील एकूणच योजना व त्याची सद्यस्थिती, जिल्हा नियोजन समितीचे कामकाजाची माहिती करून घेतली होती. त्यामुळे या बैठकीत सुरुवातीपासूनच भुजबळ यांनी जिल्हा नियोजन समितीने तरतूद केलेल्या निधीच्या खर्चाचा मुद्दा उपस्थित करून जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे वाभाडे काढले. यापूर्वी गेल्या पाच वर्षांत झालेल्या नियोजन समितीच्या बैठकांमध्ये भुजबळ यांच्या इतका बारकाईने आढावा घेतला गेला नसल्याने या बैठकीसाठी आलेल्या अधिका-यांकडे माहितीची वाणवा असल्याचे पाहून त्यांच्यातील बेफिकिरीचे प्रदर्शन नियोजन समितीच्या बैठकीत झाले. अधिका-यांना काम करता येत नसेल तर त्यांनी बदली करून घ्यावी असा निर्वाणीचा इशारा देतानाच, जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या खर्चाबाबत प्रशासनाने काय उपाययोजना केल्या त्याचा आढावा घेण्यासाठी पुन्हा आठ दिवसांत बैठक घेण्याचे सुतोवाच केले. विशेष म्हणजे भुजबळ यांच्या पुढ्यात जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीच तक्रारींचा पाढा वाचून अधिकाºयांनाही आरोपीच्या पिंजºयात उभे केल्याची बाब अधिकच गांभीर्याने घेतली गेली. जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा स्वतंत्र फेरआढावा घेण्याचे भुजबळ यांनी जाहीर केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिका-यांची धावपळ उडाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदस्यांनी ज्या ज्या विषयांवर अधिका-यांना धारेवर धरले त्या सर्व विषयांची माहिती घेऊन सोमवारी सकाळपासूनच जिल्हा परिषदेच्या प्रमुख अधिकाºयांनी प्रत्येक खातेप्रमुखांचा आढावा घेतला. सकाळपासून सुरू झालेली ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. अधिकाºयांमध्ये विकासकामांची अचानक आलेली तत्परता पाहून काही सदस्यांनी यापूर्वीच वेळेत कामे केले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती अशी प्रतिक्रियाही व्यक्तकेली.