नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात सातत्याने चढत असलेला कोरोना बाधित रुग्णांचा ग्राफ आता हळूहळू उतरण्यास सुरुवात झाली असून, गेल्या तेरा दिवसांतच जवळपास सव्वापाच हजार रुग्णांची संख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे संशयित रुग्णांची तपासणी वाढवूनदेखील बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गावागावात केलेले प्रयत्न व ग्रामस्थांनीही केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे हॉटस्पॉट ठरलेले नाशिक, सिन्नर, चांदवड, दिंडोरी, निफाड व देवळा या तालुक्यांमध्येदेखील रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली असून, निफाड व नाशिक तालुक्याच्या ग्रामीण भागात मात्र, अजूनही कोरोना ठाण मांडून बसला आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून नाशिक शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. विशेष करून नाशिक शहराशी व्यापार, व्यवसाय व नोकरी धंद्यानिमित्त संबंध येणाऱ्या लगतच्या सिन्नर, निफाड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. परिणामी रुग्ण संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडण्याबरोबरच सोयी, सुविधांचीही वाणवा जाणवली. नाशिक शहरात बेड कमी पडू लागल्याने ग्रामीणचे रुग्ण दाखल करण्यासाठी वणवण भटकावे लागले. त्यातच अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ग्रामीण भागात काेरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, गावांनीही पुढाकार घेत स्वयंस्फूर्तीने गावे बंद ठेवली. तसेच बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारला. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोरोना संशयित रुग्णांची तपासणी व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला. तसेच लक्षणे असलेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात हलविले. याचा सर्व एकत्रित परिणाम गेल्या काही दिवसांत जाणवू लागला असून, त्यातूनच १ मेच्या तुलनेत १३ मे रोजी रुग्णांची संख्या जवळपास ५३८० ने कमी झाली आहे.नऊ टक्क्यांनी दर घसरला१ मे रोजी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १६३७७ रुग्ण होते. त्यावेळी करण्यात आलेल्या एका दिवसाच्या ५२०६ संशयित रुग्णांच्या चाचणीत कोरोना बाधित सापडण्याचे प्रमाण १५०३ म्हणजेच पॉझिटिव्हीटी दर २८.८७ इतका होता. गेल्या बारा दिवसांत हेच प्रमाण आता कमी झाले असून, १३ मे रोजी जिल्ह्यात १०,९९७ इतके रुग्ण असून, ५५६७ संशयित रुग्णांच्या तपासणीतून १०९७ रुग्ण बाधित सापडले आहेत, पॉझिटिव्हीटी दर १९.७१ इतक्या खाली आला आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाच हजारांनी संख्या घटली
By श्याम बागुल | Published: May 14, 2021 1:32 AM
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात सातत्याने चढत असलेला कोरोना बाधित रुग्णांचा ग्राफ आता हळूहळू उतरण्यास सुरुवात झाली असून, गेल्या तेरा दिवसांतच जवळपास सव्वापाच हजार रुग्णांची संख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे संशयित रुग्णांची तपासणी वाढवूनदेखील बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गावागावात केलेले प्रयत्न व ग्रामस्थांनीही केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे प्रयत्न : पाॅझिटिव्हिटी दरातही मोठी घट