नाशिक : आपले राजकीय वैरी हिरे कुटुंबीयांच्या मालेगाव तालुक्यातील सूतगिरणीचा लिलाव करण्यास जिल्हा बॅँकेकडून टाळाटाळ चालविल्याच्या कारणावरून मंगळवारी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी बॅँकेत धडक देऊन संचालकांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरून सूत गिरणीचा लिलाव करा, अन्यथा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याबरोबरच बॅँकेच्या विरोधात गुन्हे दाखल करू, अशी धमकी दिल्याची जोरदार चर्चा बॅँकेच्या आवारात रंगली. दरम्यान, यासंदर्भात बॅँकेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, त्यांनी दादा भुसे बॅँकेत आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मालेगाव तालुक्याच्या राजकारणात दादा भुसे विरुद्ध हिरे कुटुंबीयांचा सामना नेहमीच रंगत आला असून, अलीकडेच हिरे कुटुंबीयांनी राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीत भुसे विरुद्ध हिरे अशी लढत रंगण्याची चिन्हे दिसत असताना दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याचाच भाग म्हणून भुसे यांनी जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून हिरेंवर दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. हिरे कुटुंबीयांच्या ताब्यात असलेली मालेगाव तालुक्यातील रेणुका सहकारी सूत गिरणी अवसायनात निघाली असून, त्यावर जिल्हा बॅँकेचे सोळा कोटी रुपयांचे कर्ज आहे. जिल्हा बॅँकेने सूत गिरणीची मालमत्ता कर्जापोटी ताब्यात घेतली असून, तिचा दोन वेळा लिलावही काढण्यात आला. परंतु अपेक्षित बोली न आल्याने जिल्हा बॅँकेने अन्य पर्यायांचा शोध सुरू ठेवला आहे. मात्र भाजपाच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बॅँकेने मुद्दामहून हिरे कुटुंबीयांवर मेहेरबानी चालविल्याच्या संशयावरून मंगळवारी दुपारी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी थेट जिल्हा बॅँकेच्या मुख्यालयाला धडक देऊन कार्यकारी संचालकांना धारेवर धरले. रेणुका सूत गिरणीचा लिलाव करण्यास उशीर का होतो, अशी विचारणा करून भुसे यांनी अन्य अधिकाºयांचीही चांगलीच हजेरी घेतली. त्यामुळे बॅँकेत धावपळ उडाली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याची धमकी देण्याबरोबरच भुसे यांनी बॅँकेवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी तंबीही दिल्याचे बॅँकेच्या काही कर्मचाºयांनी सांगितले. भुसे यांचा रौद्रावतार पाहून अधिकारी, कर्मचारी चांगलेच घाबरले. त्यांनी तातडीने बॅँकेच्या संचालकांना याची माहिती दिल्याचे सांगण्यात आले.जिल्हा बॅँकेत मी गेलो होतो, हे खरे आहे. परंतु, झोडगे ग्रामपंचायतीचे पैसे जिल्हा बॅँकेत अडकल्याने ते प्राधान्याने वर्ग करण्यासंदर्भात माझी अधिकाºयांशी चर्चा झाली. झोडगे येथे पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायतीचे जिल्हा बॅँकेकडे असलेले पैसे मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील इतरही अनेक ग्रामपंचायती आहेत. त्यांच्याही रकमा अडकल्या आहेत. रेणुका सूतगिरणीविषयी चर्चा करायची होती; परंतु संबंधित अधिकारी जागेवर हजर नव्हते. - दादा भुसे, राज्यमंत्री
ग्रामविकास मंत्र्यांकडून जिल्हा बॅँक धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:31 AM