लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वत्र चिंतेचे सावट असून, नागरिकांनी एकाच ठिकाणी गर्दी टाळण्याबरोबरच स्वच्छतेविषयक खबरदारी घेण्याचे आवाहन एकीकडे केले जात असताना दुसरीकडे मात्र ग्राम विकास विभागाने सर्व जिल्हा परिषदा व ग्रामपंचायतींना पत्र पाठवून कोरोनापासून बचावासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना व खबरदारीची माहिती देण्यासाठी गावोगावी ग्रामसभा घेण्याची सक्ती केली आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये नागरिकांना एकत्र येण्यास बंदी असताना ग्रामसभेसाठी ग्रामस्थ एकत्र आल्यास कायद्याचे उल्लंघन होणार असल्याने ग्रामविकास विभागाच्या या पत्रामुळे यंत्रणा बुचकळ्यात पडली आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना आरोग्य विभागाकडून केल्या जात असून, शासनाच्या आदेशानुसार नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी, शाळा, महाविद्यालयांना सुटी, मंदिरे, महाआरती बंद करण्यात आली आहे. सभा, समारंभांनाही परवानगी नाकारण्यात आली असून, आठवडे बाजार, यात्रा, धार्मिक उत्सव स्थगित करून नागरिकांना अधिकाधिक खबरदारी घेण्यासाठी जनजागृती केली जात आहे. परिणामी नागरिकांनीही कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र दिसू लागले आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या ग्रामविकास विभागाने दोन दिवसांपूर्वी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सरपंचांना पत्र पाठवून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व प्रतिबंधक उपाययोजनांबाबत ग्रामपातळीवर काय करता येईल यासाठी आठवड्यातून एक दिवस ग्रामसभा घेण्याचे फर्मान काढले आहे. मुळात कोरोनाविषयी अजूनही समाजात अनेक समज-गैरसमज असून, सर्वसाधारणपणे सर्दी, खोकल्याचे प्राथमिक लक्षणांतूनच या आजाराचे निदान होत असते. सध्या हवामानातील बदल पाहता, सर्वत्र सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येतात. अशा परिस्थितीत विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी शक्यतो नागरिकांना एकमेकांपासून दूर ठेवणे हाच उपाय असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. परंतु ग्रामविकास विभागाने गावोगावी ग्रामसभा घेण्याची सक्ती करून विखुरलेल्या ग्रामस्थांना पुन्हा एकत्र आणून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांनाच हरताळ फासला जाणार आहे. एकीकडे नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून कायद्याचा धाक दाखवायचा तर दुसरीकडे याच नागरिकांनी एकत्र यावे यासाठी ग्रामसभा घ्यायच्या अशा परस्पर भिन्न निर्णयामुळे ग्रामविकास अधिकारी पेचात सापडले आहेत.