भंडारा येथील दुर्घटनेने संपूर्ण आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडल्याने शासनाने त्याची गंभीर दखल घेतली असून, घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वच शासकीय व खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले किंवा नाही याची माहिती शासनाने मागविली आहे. ज्या रुग्णालयांचे फायर ऑडिट झालेले नाही ते तात्काळ करण्याचे आदेश देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांची माहिती मागविली असता, सुमारे ११० आरोग्य केंद्रांत गेल्या दोन वर्षांपासून फायर ऑडिटच झालेले नाही. मात्र, सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये अग्निरोधक यंत्र बसविण्यात आले असून, त्याच्या देखभाल व दुरूस्तीचे काम फेबर सिंदुरी या कंपनीला देण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांत कोणत्याही आरोग्य केंद्रात आगीची दुर्घटना घडलेली नसली तरी, त्यावर समाधान न मानता येत्या एक महिन्यात सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे फायर ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. फायर ऑडिटबरोबरच रुग्णालयांच्या बांधकामाच्या संरचना याचीही तपासणी करून त्यांच्याकडून ना-हरकत दाखला घेण्याचे तसेच फायर ऑडिटबरोबरच शॉर्टसर्किटमुळेही आगीच्या दुर्घटना घडू शकतात, हे लक्षात घेवून इलेक्ट्रीक सेफ्टी ऑडिट करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर यांनी दिल्या आहेत.
चौकट===
रंगीत तालीम करणार
भंडारा येथील दुर्घटनेसारखी दुर्घटना घडल्यास परिस्थिती हाताळता यावी, यासाठी सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याचे तसेच त्यांच्याकडून रंगीत तालीम करून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.