-पुष्पा गवळी -आरोग्यमंत्र्यासह पंचायत राज ला साकडे
पुष्पा गवळी : आरोग्यमंत्र्यासह पंचायत राजला साकडे
पेठ -तालुक्याची वाढती लोकसंख्या, वाहनांचे प्रमाण व होणारे अपघात लक्षात घेता करंजाळी येथे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय बांधण्यात यावे, अशी मागणी पेठ पंचायत समितीच्या माजी सभापती पुष्पा गवळी यांनी केली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले. पेठ तालुक्यातील मुख्य बाजारपेठ व नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या करंजाळी परिसरात कोटंबी व सावळघाटात वारंवार अपघात होत असल्याने रुग्णांना उपचारासाठी नाशिक येथे न्यावे लागते. तत्काळ उपचार मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत असल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच करंजाळी परिसरात जवळपास ५० ते ६० गावांतील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय सुरू करावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.