लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिसांशी थेट संवाद साधता यावा तसेच त्यांच्या तक्रारी वा सूचना पोलिसांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी सोशल मीडिया सेल कार्यान्वित केला आहे़ नागरिकांना आता आपल्या तक्रारी सोशल मीडियावरील व्हॉट्सअॅप, टिष्ट्वटर, फेसबुक याद्वारे नोंदविता येणार असून, याचे औपचारिक उद्घाटन ग्रामीण पोलीस मुख्यालयात अधीक्षक दराडे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि़७) करण्यात आले़सध्याचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग असून, ग्रामीण भागातही अॅण्ड्रॉइड मोबाइलद्वारे इंटरनेट पोहोचले आहे़ सोशल मीडियावरील व्हॉट्सअॅप, फेसबुक, टिष्ट्वटरद्वारे माहितीचे आदान-प्रदान केले जाते़ सामान्य नागरिकांना त्यांच्या प्रतिक्रिया अथवा काही तक्रारी असतील तर ते नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे फेसबुक पेज ‘नाशिक रूरल पोलीस’, टिष्ट्वटर अकाउंट @एसपी रूरल, व्हॉट्सअॅप (९१६८५५११००) यावर करता येणार आहे़ सोशल मीडियाद्वारे नागरिकांना नवनवीन माहिती मिळण्यास मदत होणार असून, आपले मत मांडण्यासाठी व्यासपीठ व संवादाचे माध्यम मिळणार आहे़ यावेळी अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे, अशोक कर्पे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़
नागरिकांच्या तक्रारींसाठी ग्रामीण पोलिसांचा ‘सोशल मीडिया सेल’
By admin | Published: July 09, 2017 12:12 AM