देवळा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यात बुधवार दि. १२ रोजी दुपारी १२ वाजेपासून दि. २३ मे पर्यंत सलग दहा दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दहा दिवस वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याच्या धास्तीमुळे देवळा शहरात नागरिकांची मंगळवारी सकाळी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी धावपळ उडाली.
सकाळपासूनच शहरातील किराणा दुकान, भाजीपाला, तसेच दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली. नागरिकांनी एकच गर्दी केल्याने सर्वत्र जमावबंदी तसेच कोरोना नियम पायदळी तुडविल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत पाच कंदील परिसरात भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे गर्दी होऊन सामाजिक अंतराचे उल्लंघन होत असल्यामुळे देवळा नगरपंचायतीने या विक्रेत्यांना कोलती नदीपात्रात भाजीपाला दुकाने थाटण्यास सांगितले होते. परंतु, गर्दी झाल्यामुळे नियमांचे सर्रास उल्लंघन होत होते.