नाशिक : जुलैपासून ऑनलाइन शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभाग विचार करत असले तरी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून सूट देण्यात येणार असल्याचे स्पष्ट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, शहरातील विविध खासगी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांना घाई झाली असून, शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. त्यासाठी आवश्यक शालेय साहित्यासह गणवेशही शाळेकडूनच खरेदी करण्याची सक्ती संबंधित शाळांकडून केली जात आहे. शहरातील इंग्रजी माध्यमांच्या काही खासगी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहे. या वर्गांत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना गणवेश बंधनकारक करण्यात येत असून, पालकांना विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके व गणवेश संबंधित शाळांकडून घेण्यास सांगितले जात आहे. शाळा सुरू करण्याविषयी स्पष्ट सूचना नसताना शाळांकडून अशाप्रकारे गणवेश व पाठ्यपुस्तकांची सक्ती का करण्यात येत असल्याने पालकही संभ्रमात आहेत. दरम्यान, शिक्षण विभाग आॅनलाइन शाळा सुरू करण्यासंदर्भात विचार करत असला तरी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून सूट देण्यासोबतच केवळ नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैमध्ये सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविला आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने शासकीय शाळा अजूनही शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र काही खासगी संस्थांकडून ऑनलाइन माध्यमातून पूर्व प्राथमिकच्या नर्सरीसह, जुनियर व सिनियर केजी वर्गांसह पहिली, दुसरीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात घाई सुरू झाली आहे. पूर्व प्राथमिक शाळांना सरकारी अनुदान किंवा मदत मिळत नाही. त्यांचे आर्थिक समीकरण विद्यार्थ्यांच्या शुल्कावरच अवलंबून असते. जितके अधिक विद्यार्थी तेवढेच अधिक उत्पन्न असे समीकरण बनले आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावू नये यासाठी ऑनलाइन शिक्षणप्रणालीतून शाळांकडून धडपड सुरू आहे. यातूनच विद्यार्थ्यांचा पट वाढविण्याची स्पर्धा निर्माण झाली असून, गतवर्षात पालकांसोबत संवाद साधण्यासाठी तयार केलेल्या व्हॉट्सअॅप गु्रपच्या माध्यमातून झूम, गुगल मीटसारख्या अॅपच्या लिंक शेअर करून विविध शाळांनी नवीन शैक्षणिक वर्षांचे वर्ग सुरू करण्याची घाई सुरू केली आहे.
खासगी पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळांना ऑनलाइन शिक्षणाची घाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 6:08 PM
शहरातील विविध खासगी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांना घाई झाली असून, शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. त्यासाठी आवश्यक शालेय साहित्यासह गणवेशही शाळेकडूनच खरेदी करण्याची सक्ती संबंधित शाळांकडून केली जात आहे.
ठळक मुद्देनवीन शैक्षणिक वर्षांचे ऑनलाईन वर्ग सुरू करण्यासाठी शाळांची घाई शालेय साहित्यासह गणवेशही शाळेकडूनच खरेदी करण्याची सक्ती