नाशिक : येत्या २६ जानेवारीपासून महापालिकेची बससेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी आरंभली असून, अडथळे दूर करण्यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनीच पुढाकार घेतला आहे. गोल्फ क्लब मैदानावरील जागेची शहर-ए-खतिबांना दाखवून बस टर्मिनल म्हणजे डेपो नाही तसेच मैदानावर बसदेखील नेली जाणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे बऱ्यापैकी गैरसमज दूर झाल्याचा दावा आयुक्त कैलास जाधव यांनी केला आहे.
दरम्यान, बस शेल्टर सुरू करण्यासाठी पीपीपी तत्त्वावर त्वरित शेल्टर आणि पीकअप शेड तयार करण्याचे आदेशही गुरुवारी (दि.७) आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या वतीने येत्या २६ जानेवारीपासून बससेवा सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात डिझेलच्या पन्नास बस रस्त्यावर आणण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. नाशिकरोड आणि पंचवटी विभागातून एकूण नऊ मार्गांवर बस येतील; परंतु असे असले तरी अडथळ्यांची स्पर्धा संपलेली नाही. गोल्फ क्लब मैदानाजवळ असलेल्या इदगाह मैदानालगत बस टर्मिनल करण्यात येत असल्याने मुस्लीम समाजाच्या काही संघटनांनी विरोध केला आणि आयुक्तांची भेटदेखील घेतली होती. त्यानंतर गुरुवारी (दि. ७) आयुक्त कैलास जाधव, शहर-ए-खतीब तसेच नगरसेवक समीना मेमन यांनी प्रत्यक्ष गोल्फ क्लब येथे जाऊन पाहणी केली. राजदूत हॉटेलच्या बाजूने असलेल्या जागेत आणि मैदानाच्या अगोदर असलेल्या जागेचा मनपा वाहनतळ म्हणून येथील कार्यक्रमाच्या वेळी वापर करते. त्याच जागेत प्रवासी घेऊन बस निघतील. त्यामुळे अडचण निर्माण हेाणार नसल्याचे आयुक्त जाधव यांनी स्पष्ट केले. त्यानंतर गैरसमज दूर झाले असल्याचे आयुक्तांनी सांगितले. भविष्यात नमाजपठणाची जागा बस डेपोसाठी वापरणार असल्याच्या शंकेचेदेखील निरसन करण्यात आले असून, हे मैदान मोकळेच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. येथील झोपडपट्ट्यांची अतिक्रमणे हटवण्याबरोबरच मैदानावर जाण्यासाठी एक चाळीस फूट रस्ता तयार करण्यात येणार असल्याची माहितीही शहर अभियंता संजय घुगे यांनी दिली.
इन्फेा...
समाजातील घटकांशी चर्चा करणार
आयुक्तांसमवेत भेट झाल्यानंतर त्यांनी काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले असले तरी शहर-ए-खतीब, विविध संस्था आणि अन्य मान्यवरांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती नगरसेवक समीना मेमन यांनी दिली.