लोहोणेर/ ठेंगोडा : अंगारकी चतुर्थीनिमित्त ठेंगोडा येथील स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मंगळवारी भल्या पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. अंगारकी चतुर्थीनिमित्त कसमादेसह नाशिक, धुळे, अहमदनगर, ठाणे, मुंबई, पुणे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य भाविक आज श्रींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने आले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. पहाटे साडेतीन वाजता भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने आज येथे बाहेरगावाहून आलेल्या भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर परिसरात आज पेढे, फुले, हार, दुर्वा, नारळ आदींसह खेळणी, कटलरीची तसेच फळे, चहाची दुकाने लावण्यात आल्याने मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. रात्री उशिरापर्यंत मंदिर श्रींच्या दर्शनासाठी भाविकांकरिता उघडे ठेवण्यात आले होते. मंदिरालगत असलेल्या राज्य महामार्गावर दुतर्फा दुचाकी व चारचाकी वाहनांच्या दूरवर लांबचलांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीस वेळोवेळी अडथळा निर्माण होत होता.
अंगारकीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:22 AM