भारताच्या तुलनेत युक्रेनमध्ये केवळ ३० टक्के खर्चात वैद्यकीय शिक्षण मिळत असल्याने नाशिकरोड भागातील आनंदनगर जगताप मळा येथील अदिती विवेक देशमुख या विद्यार्थिनीसह गंगापूररोड भागातील सावरकरनगर येथील प्रतीक प्रमोद जोंधळे असे दोघेजण याचवर्षी युक्रेनमधील खारकीव मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षणासाठी गेले आहेत.
वसतिगृहात अडकले आहेत. हे दोन्ही विद्यार्थी त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असले तरी त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने दोघांच्याही कुटुंबीयांनी स्थानिक जिल्हा प्रशासन व खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे मदत मागितली आहे. त्यानुसार खासदार गोडसे यांनी परराष्ट्र मंत्रालयात विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पाठपुरावा सुरू केला असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता व त्यांना परत आणण्याच्या प्रक्रियेतील प्रगतीविषयी नियमित माहिती दिली जात असल्याचे दोन्ही विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.
आदिती वैद्यकीय शिक्षणासाठी प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करून जानेवारी २०२२ मध्ये युक्रेनमध्ये गेली आहे. मात्र, रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव निर्माण झाल्याने आदितीसह महाराष्ट्रातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या तळघरात आश्रय घेतला आहे. सध्या ते सुरक्षित असले तरी युद्धजन्य परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेस अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
- सचिन देशमुख, आदितीचे काका
युक्रेनमधील मेडिकल कॉलेजने प्रवेशाचे शुल्क व विद्यार्थ्यांच्या निवासाचे शुल्क वसूल करण्यावर भर दिला. मात्र विद्यार्थ्यांना सुरक्षितरीत्या भारतात परत पाठविण्यासाठी योग्य वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अशी संकटाची वेळ आली आहे. आता सरकारने परदेशातील संस्थांसोबत संवाद साधत विद्यार्थ्यांना सुरक्षितरीत्या परत आणण्यासाठी तत्काळ कारवाई करण्याची अपेक्षा आहे.
- प्रमोद जोंधळे, प्रतीकचे वडील
जिल्हा प्रशासनाला पालकांकडून मिळणारी माहिती तातडीने राज्य शासनाला पाठविण्याचे नियोजन करण्यात आलेले असून, शासनाबरोबर तातडीने संपर्क केला जात आहे. या दोन्ही देशामध्ये कुणी अडकले असतील आणि त्यांनी पालकांना संपर्क केला असेल तर त्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाला कळवावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले आहे.
नाशिकमधील अनेक विद्यार्थी परदेशात
नाशिकमधून अनेक विद्यार्थी रशिया, ऑस्ट्रेलिया आणि यूएसला शिक्षणासाठी गेलेले आहेत. युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपत असल्याची शक्यता असून, रशियात गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत याबाबतची कोणतीही माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली नव्हती. दोन पालकांव्यतिरिक्त इतर पालकांनी अद्याप संपर्क केेलेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला काहीसा दिलासा आहे.