नाशिक : युक्रेन शहरापासून दूर सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर चर्नीव्हिट्सीमध्ये असल्याने युद्धाची झळ तेंव्हा आमच्यापर्यंत पोहोचली नाही. मात्र युक्रेनमधील शहरे जसजसी उद्ध्वस्त होत राहिली तसतसा त्याचा फटका आम्हाला बसला. एटीएममधून पैसे काढण्यावर निर्बंध आले, मॉल्स रिकामे होऊ लागले. खाण्यापिण्याच्या साहित्याचा तुटवडा निर्माण होत गेला आणि विमानांचे भाडे तीन पटीने वाढल्याने मायदेशी परतण्याची वाट दूर होत राहिली. दरदिवशी युद्धाची दाहकता वाढत असल्याने काळजाचा ठोका चुकत होता स्वत:साठी, कुटुंबीयांसाठी आणि विमानतळांवर अडकलेल्या मित्रांसाठी.
युक्रेनच्या विध्वंस झालेल्या भूमीतून मायदेशात सोमवारी परतलेल्या नाशिकच्या रिद्धी शर्मा हिने आपल्या परतीचा थरारक अनुभव सांगितला. युक्रेन सोडण्याची वेळ आली; मात्र परतीचा मार्ग कसा असेल याबाबतची चिंता सतावत होती. खाण्यापिण्याच्या वस्तू लागणार होत्या; पण मॉल्स रिकामे होत राहिले. एटीएमच्या बाहेरही रांगाच रांगा लागत होत्या. शिवाय प्रत्येकाला केवळ २ हजार रुपये इतकेच काढता येत असल्याने इतक्या पैशात पुढे किती दिवस काढायचे, असा प्रश्नही होता.
भारतात परतण्यासाठीच्या विमान प्रवासाच्या यादीत नाव आले; मात्र चर्नीव्हिट्सी ते रुमानियाच्या बुकारेस्टपर्यंत पोहोचण्यासाठीचे ते ११ तास अनिश्चिततेने घेतले होते. कधी काय होईल हे कुणीही सांगू शकत नव्हते. विद्यापीठातून सायरट बाॅडेरकडे बसने निघालो. त्या बसचे वाढीव भाडे आम्हाला द्यावे लागले. बुकारेस्ट विमानतळाच्या दिशेने माणसांचे लोंढे येत असल्याने रस्त्यात कार, ट्रक्स, बस अशा गाड्यांच्या रांगा लागल्याने ट्रॅफीक जाम झाले होते. त्यामुळे आठ किलोमीटर मागेच आम्हाला उतरावे लागले. तेथून पायपीट करीत आम्ही विमानतळावर पोहोचलो. या ठिकाणी युक्रेनी नागरिकांचा रोष भारतीय विद्यार्थ्यांवर वाढत होता. गर्दीमुळे विमानांनाही विलंब होत होता. उणे तापमानात रात्र काढावी लागली; मात्र झोप कुणालाही लागत नव्हती, असे सांगताना रिद्धीच्या डोळ्यांत मात्र अश्रू तरळत होते.
सायंकाळी पाच वाजता बुकारेस्टवरून भारतासाठी भारतीय विमानाने उड्डाण घेतले आणि आम्ही दुसऱ्या दिवशी भारतीय वेळेनुसार शनिवारी दुपारी ३ वाजता दिल्लीला पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर आता सुरक्षित वाटतेय; मात्र युक्रेनमध्ये अडकलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींच्या सुटकेची चिंता वाटतेय, असे सांगून रिद्धीच्या नजरा टीव्हीवर युद्धाच्या बातमीवर खिळतात आणि चेहरा खिन्न होतो.
युक्रेनमधून भारतात परतण्यासाठी किमान २० ते २५ हजार रुपये इतके भाडे लागते. परंतु, युद्धामुळे युक्रेनियन भूमीवरून विमानांची उड्डाणे बंद झाली आणि रूमानियाच्या बाॅर्डरवरून विमाने असल्याने तेथून भारतात येण्यासाठी तीनपट भाडे वाढविण्यात आले. म्हणजे २० हजारांचे तिकीट ६० हजारांना झाले. ज्यांना भाडे भरणे शक्य होते, त्यांनी तिकिटे मिळविली.
युक्रेनी आणि भारतीयांमध्ये भांडणे
बुकारेस्टजवळ पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना तेथील सुरक्षारक्षकांनी मारहाण केल्याच्या घटनेनंतर सर्व विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे. युद्ध पेटत असताना विमानतळावर युक्रेनी नागरिक आणि भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भांडणे होत होती. भारतीय विद्यार्थ्यांसाठी विमानांची व्यवस्था होत असताना तेथील नागरिकांना मात्र विमानांची सोय होत नसल्याने त्यांच्यात रोष होता.
२७ तारखेचे फ्लाईट तिकीट मिळाले
युक्रेनमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होत असतांना १५ तारखेलाच विद्यार्थ्यांना प्रशासनाने मायदेशी परतण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रिद्धीने विमानाचे तिकीट घेतले. २७ फेब्रुवारीचे तिकीट मिळाल्याने तीने मायदेशी निघण्याची तयारी केली होती. मात्र २४ तारखेपासूनच युद्धाला सुरूवात झाली आणि तिला विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच थांबावे लागले. २७ तारखेपूर्वीचे तिकीट मिळाले असते तर कदाचित रिद्धी विमानतळावर अडकून पडली असती. कारण युद्धानंतर युक्रेनची हवाई सेवा तत्काळ बंद करण्यात आली. त्यामुळे अनेक विद्यार्थी अडकून पडले होते.