नाशिक : कोरेानाच्या दुसऱ्या लाटेमुळे एस. टी बसेसची चाके थांबल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ वेतनाचाच प्रश्न नसून, डिझेलची देखील थकबाकी वाढत असल्याने महामंडळावर आर्थिक ताण ओढावला आहे. प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नातून सर्वाधिक खर्च हा वेतनावर होत असल्याने निदान कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महामंडळाला शासनाची मदत घेण्याची वेळ आली आहे.
केारोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून एस. टी. महामंडळाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोेरे जावे लागले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य शासनाने एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ... कोटींचे विशेष पॅकेज दिले होते. यावर्षी जानेवारीपासून काही प्रमाणात बसेस सुरळीत झाल्या असतानाच मार्चच्या मध्यावर बसेसला पुन्हा कोरोनाचा ब्रेक लागला. या काळात प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे एस. टी.ने मालवाहतुकीतून आर्थिक तूट भरून काढण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महामंडळाने इतर पर्यायांचा विचार करून प्रश्न सोडवावा, असे आवाहन केले होते. त्यानुसार महामंडळाने अनेक बसेसचे रूपांतर मालवाहू वाहनात करून मालवाहू सेवा सुरू केली होती. त्यातून थोडाफार दिलासा मिळाला असला तरी वेतनाचा प्रश्न मिटू शकला नाही.
यंदा कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन कसेबसे करण्यात आले. मात्र, मे महिन्याचे वेतन मिळू शकलेले नाही. दर महिन्याच्या सात तारखेला कर्मचाऱ्यांच्या हातात पेमेंट स्लीप दिली जाते. परंतु, यंदा अजूनही पेमेंट स्लीप देण्यात आलेली नसल्याने मे महिन्याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता दहा तारखेपर्यंत याबाबत तोडगा निघू शकेल असा आशावाद व्यक्त केला.
--इन्फो--
राज्यातील बसेस : १६०००
कर्मचारी संख्या : ९,०००
वेतनावरील खर्च : २९० कोटी