नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही पर्वण्यांसाठी लाखो भाविक येण्याची शक्यता असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची वाहनतळावरून ने-आण कशी करणार अशी विचारणा करून, शहरात येणाऱ्या गर्दीचे नियोजन त्यावरच अवलंबून असल्याने एस. टी. महामंडळाने त्याचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कुंभमेळ्याची साप्ताहिक आढावा बैठक जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना बाह्य वाहनतळावर रोखल्यानंतर त्यांना अंतर्गत वाहनतळापर्यंत आणण्यासाठी एस. टी. बसच्या नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले. मोठ्या संख्येने येणाऱ्या प्रवाशांची बसस्थानकावर होणारी गर्दी व त्यांना तिकीट देण्यासाठी वाहकाची उडणारी दमछाक पाहता, बसस्थानकांवर त्यासाठी तिकीट केंद्रे उघडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रवाशांनी तिकिटे घेतल्यास ते थेट बसमध्ये जाऊन बसतील. काही मार्गावर दोन ते चार दिवसांसाठी प्रवासासाठी भाविकांना पासची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. जेणे करून भाविक कोठूनही प्रवास करू शकतील. त्याचबरोबर प्रत्येक बसमध्ये फक्त चालकच ठेवावा, विना वाहक बसेसचा अधिकाधिक वापर करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. एस.टी. विभागाने सुमारे दोन हजार बसेसची मदत घेण्याचे ठरविले आहे व पाचशे बसेस अतिरिक्त तैनात असतील, या सर्व बसेसच्या माध्यमातून ५६ लाख भाविकांची वाहतूक होण्याचा अंदाज आहे. मंगळवारच्या बैठकीत ‘यशदा’च्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आयसीएस (इन्सिडन्स कंट्रोल सिस्टीम) बाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत करावयाच्या उपाययोजना व खबरदारीबाबत काय काय करता येईल याबाबत सादरीकरणही करण्यात आले. (प्रतिनिधी)
एस. टी. महामंडळाने त्याचे सूक्ष्म नियोजन करावे,
By admin | Published: February 04, 2015 1:53 AM