लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असताना दुसरीकडे आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना संशयित रुग्ण शोध घेत असताना शारीरिकदृष्ट्या दुर्धर आजाराने बाधित रुग्णांचाही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शोध सुरू केला असून, अशा रुग्णांची स्वतंत्र माहिती संकलित करण्यासाठी आरोग्य विभागाने ‘सचप्रणाली’ नावाचे अॅॅप तयार केले आहे. सिन्नर तालुक्यात प्रायोगिक पातळीवर त्याची सुरुवात करण्यात आली आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी सिन्नर तालुक्याला भेट देऊन तेथील अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत कोरोना प्रादुर्भाव या संदर्भात लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या समस्या व त्यावर करावयाची उपाययोजना या संदर्भात समन्वयाने चर्चा करण्यात आली. कोरोना हे देशावरील संकट असल्याने सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याची भूमिका अध्यक्ष क्षीरसागर यांनी मांडली.
‘सच’ अॅपद्वारे शारीरिकदृष्ट्या दुर्धर तथा इतर आजाराने बाधित असल्यास ते रुग्ण तत्काळ शोधण्यास मदत होणार आहे. भविष्यात कोविड आजारावर मात करण्यासाठी सदर ‘सच’ अॅपप्रणालीचा चांगला उपयोग होणार आहे. सदर अॅपद्वारे विविध आजारांनी बाधित रुग्णास कोविड बाधित होण्याचा धोका जास्त असल्याने अशा रुग्णांना विशेष आरोग्यसेवा तत्काळ उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. सदरच्या ‘सच्’अॅपप्रणाली सिन्नर तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू करण्यात आला आहे. ‘सच्’अॅपचा अनुभव लक्षात घेऊन संपूर्ण नाशिक जिल्ह्यात या अॅपचा वापर जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात येणार आहे. या अॅपचा शुभारंभ करण्यात आला. सदर ‘सच’अॅप विकसित करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील बँक आॅफ महाराष्ट्र यांनी सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोविडविरोधी मोहिमेत सामाजिक बांधिलकी म्हणुन बँक आॅफ महाराष्ट्र यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्य कार्यकारी बनसोड यांनी बॅँकेचे आभार मानले. बैठकीस जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, सीमंतिनी कोकाटे, पंचायत समिती सभापती शोभा बरके, उपसभापती संग्राम कातकाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, डॉ. चौधरी, डॉ. मोहन बच्छाव, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, डॉ. निर्मला गायकवाड, पंचायत समिती सदस्य जगन भाबड, संगीता पावसे, भगवान पथवे, सुमन बर्डे आदी उपस्थित होते.