सिन्नर : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी संदीपसह १८ जवानांचा बळी घेतला. सरकार भारतीय लष्कराच्या पाठीशी ठामपणे उभे राहत बदला घेतला. हीच शहीद संदीप याच्यासाठी मोठी श्रध्दांजली असल्याची भावना शहीद संदीप यांचे बंधू योगेश, वडील सोमनाथ व आई विमल ठोक यांनी व्यक्त केली.लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दशहदवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती आम्हाला गुरुवारी दुपारी समजली. पाकिस्तानला धडा शिकवावा अशी भारतीयांची इच्छा होती. सरकारने खंबीर भूमिका घेत बदला घेतल्याने संदीपला खऱ्या अर्थाने श्रध्दांजली अर्पण केल्यासारखे वाटते असे योगेश ठोक यांनी सांगितले. सरकारने केलेल्या या कारवाईच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असल्याचेही योगेश ठोक यांनी सांगितले. १८ सप्टेंबर रोजी दहशतवाद्यांनी उरी येथे भारतीय लष्करी तळावर केलेल्या भ्याड हल्ल्यात खडांगळी येथील संदीप ठोक (२५) हे शहीद झाले होते. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याबद्दल खडांगळी ग्रामस्थांसह सिन्नर तालुकावासियांनी समाधान व्यक्त केले. शहीद संदीप ठोक यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या वडांगळी येथील विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी कारवाईचे जोरदार स्वागत केले. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सिन्नर येथील फटाके फोडून कारवाईचे समर्थन केले. (वार्ताहर)सरकार व लष्कराने दहशतवाद्यांना धडा शिकवून माझ्या संदीपचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले नाही. या कारवाईमुळे समाधान वाटले. दहशतवाद्यांचे संपूर्ण तळ उद्ध्वस्त झाले पाहिजेत. -विमल ठोक, शहीद संदीप यांची आई
‘व्यर्थ न झाले बलिदान...’
By admin | Published: October 01, 2016 12:45 AM