नाशिक : जळगाव येथील रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्या प्रकरणातील संशयित वाळू ठेकेदार सागर मोतीलाल चौधरी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी (दि़ २८) दोन्ही पक्षांतर्फे युक्तिवाद केला जाणार असून, त्यानंतर सुनावणी होणार आहे़ सोमवारी (दि़ २६) दोन्ही पक्षाच्या वकिलांनी आपले लिखित म्हणणे न्यायाधीश एस़ आऱ कदम यांच्याकडे सुपूर्द केले़आत्महत्त्येपूर्वी पोलीस निरीक्षक सादरे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार जळगावचे गामीण पोलीस अधीक्षक डॉ़ जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व वाळू ठेकेदार सागर मोतीलाल चौधरी यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यातील संशयित चौधरी यांनी २० आॅक्टोबरला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता़ जिल्हा व सत्र न्यायाधीश कदम यांच्या न्यायालयात सरकार पक्षाचे अॅड़ राजेंद्र घुमरे, फिर्यादी माधुरी सादरे यांचे वकील उमेश वालझाडे, तर चौधरीचे वकील मुकेश श्ािंपी व बिपीन पांडे यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले़ त्यामध्ये सरकारी वकिलांनी पोलीस निरीक्षक सादरे यांची चिठ्ठी, चौधरी यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची कागदपत्रे तसेच विविध दैनिकांमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तांची कात्रणे सादर केली. चौधरीचे वकील शिंपी व पांडे यांनी सरकार पक्षाने दिलेल्या लेखी म्हणण्यावर युक्तिवादासाठी दोन दिवसांचा वेळ मिळावा, अशी विनंती न्यायालयाकडे केली़या अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीच्या वेळी सादरे यांच्या पत्नी माधुरी, भाऊ प्रवीण, मुलगी पूनम हजर होते़ यावेळी सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्यासह पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने न्यायालयात हजर होते़ या अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीप्रसंगी चौधरी समर्थकांनी न्यायालयात मोठी गर्दी केली होती़ (प्रतिनिधी)
सादरे आत्महत्त्या प्रकरण : चौधरींच्या गुन्ह्यांची यादी न्यायाधीशांकडे सादर
By admin | Published: October 27, 2015 12:24 AM