नाशिक : ‘ते’ येणार म्हटल्यावर जिल्हाधिकाऱ्यांपासून महापालिका आयुक्तांपर्यंत झाडून सगळ्यांच्या चिंतेत भर पडणार... ‘यह ऐसा क्यों नहीं’, ‘वह वैसा क्यों’ म्हणत ते प्रश्नांची सरबत्ती करणार... सगळा अधिकारीवर्ग ‘जी महाराज, हो जाएगा’ म्हणत माना हलवणार... असे आजवरचे चित्र असताना, आज मात्र त्यात बदल घडला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांविषयी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी चक्क समाधान व्यक्त केले. ‘गये कुंभ की तुलना से इस बार बहुत अच्छा काम हुआ हैं, इससे हम बहुत संतुष्ट हैं..’ अशा शब्दांत त्यांनी सिंहस्थ कामांविषयी प्रशस्तिपत्र दिले अन् अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू पसरले.महंत ग्यानदास यांनी आज सायंकाळी तपोवनातील साधुग्रामची पाहणी केली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, कुंभमेळा अधिकारी महेश पाटील यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. ग्यानदास यांनी साधुग्रामची पाहणी केली व त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना कामांविषयी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, गेल्या कुंभमेळ्यात साधुग्रामसाठी १०८ एकरच जागा देण्यात आली होती. यंदा मात्र ती ३३५ एकर एवढी आहे. गेल्या वेळी साधूंचे तीनशे खालसे होते, ते आता सातशे झाले आहेत; मात्र प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. अन्य ठिकाणच्या कुंभमेळ्यांच्या तुलनेत नाशिक येथे उत्तम सोय झाली असून, याबाबत आपण समाधानी आहोत. उद्याच्या पर्यावरण दिनानिमित्त होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत आपल्यासह साधू-महंत सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी ग्यानदास यांनी साधूंसाठीच्या प्रसाधनगृहांची पाहणी करीत तेथे साध्या शौचालयांसह कमोडचीही व्यवस्था करण्याची सूचना केली. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी साधुग्रामचा नकाशा दाखवत ग्यानदास यांना माहिती दिली. तसेच ‘साधुग्राम’ या मोबाइल अॅपविषयी त्यांना अवगत केले. या अॅपवर ‘प्लॉट’चा क्रमांक टाकताच तातडीने मार्ग दाखवला जातो. कोणाला विचारण्याची गरज उरत नाही, असे त्यांनी महंतांना सांगितले. साधुग्रामची वाहनातून पाहणी केल्यानंतर प्रशासकीय कार्यालयात अनौपचारिक बैठक झाली. त्यावेळी उपस्थित साधू-महंतांमध्ये चर्चा झाली.यावेळी दिगंबर अनी आखाड्याचे महंत रामकिशोरशास्त्री, महंत भक्तिचरणदास, महंत रामसनेहीदास, महंत विश्वंभरदास, पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे, महापालिका शहर अभियंता सुनील खुने, पोलीस निरीक्षक अनिल पवार, मिळकत व्यवस्थापक बी. यू. मोरे, धनंजय बेळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
साधुग्राम पाहणी : गेल्या वेळपेक्षा चांगली कामे झाल्याबद्दल दिले प्रशस्तिपत्र
By admin | Published: June 05, 2015 12:39 AM