Simhastha Kumbh Mela Nashik: राज्य शासनातर्फे स्थापन करण्यात येणाऱ्या सिंहस्थ प्राधिकरणात आम्हालाही सहभागी करून घ्यावे तसेच साधूग्रामसाठी कायमस्वरूपी ५०० एकरपेक्षा अधिक जागा अधिग्रहीत करावी, अशी एकमुखी मागणी साधू महंतांनी प्रशासनाबरोबर झालेल्या पहिल्याच बैठकीत केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे उपस्थित होते. तर आखाड्यांच्यावतीने महंत भक्तीचरण दास महाराज, महंत सुधीरदास महाराज, फलहारी बाबा महाराज, अनिकेत शास्त्री यांच्यासह ७०पेक्षा अधिक साधू-महंत उपस्थित होते.
साधू-महंतांनी कोणत्या मागण्या केल्या?
यावेळी साधू-महंतांनी आखाड्यांना योग्य जागा मिळावी, सर्व आखाडे, खालसे प्रमुख आणि सार्वजनिक संस्थांना यापूर्वीचा गर्दीचा अभ्यास करून नियमानुसार जागा उपलब्ध करून द्याव्यात, गोदावरी नदीतील गाळ काढून पात्र स्वच्छ करावे, जेणेकरून भाविकांना शुद्ध तीर्थ मिळू शकेल, शहरातील सर्व मंदिर परिसर व कुंभमेळाच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी पार्किंगची योग्य व्यवस्था करणे, उत्तर प्रदेशमधील प्रयागराज कुंभमेळ्यातील गर्दीचा अनुभव घेऊन, नाशिक - त्र्यंबकेश्वरमध्ये योग्य नियोजन करावे, "शाही स्नान" ऐवजी "अमृत स्नान" या शब्दप्रयोगाचा वापर करावा, ज्यामुळे कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व जगभर पसरेल, अशा मागण्या करण्यात आल्या.
...या महंतांची उपस्थिती
माउली धामचे महंत रघुनाथ दास महाराज, महंत अनिकेत शास्त्री, हनुमान मंदिराचे महंत शंकर दास, दिगंबर आखाड्याचे राघवदास त्यागी, महंत बैजनाथ स्वामी, महंत दीपक बैरागी महाराज, महंत बालकदास महाराज, महंत चंद्रमादास काठिया, रघुनंदन दास महाराज, महंत पवनदास लक्ष्मणदास महाराज, श्री महंत नारायणदास महाराज, महंत शंकरदास महाराज, माधवदास राठी महाराज, रामतीर्थ गोदावरी समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, श्री कालिका मंदिराचे अध्यक्ष गुलाब पाटील, रामतीर्थ गोदावरी सेवा संघाचे दत्तात्रय खोचे, जयंत गायधनी, नाशिक धान्य किराणाचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, शिवाजी पाटील यांच्यासह ७० महंतांची उपस्थिती होती.
बैठकीत ज्या सूचना साधू - महंत आणि सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांनी मांडल्या आहेत. त्याबाबतचा सविस्तर अहवाल हा मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि विभागीय आयुक्त यांना सादर केला जाईल. त्यावर सकारात्मक चर्चा होईल आणि त्यानंतर सूचना मिळतील, त्याची अंमलबजावणी केली जाईल. गोदावरी स्वच्छतेची मोहीमही हाती घेतली जाईल. त्या दृष्टिकोनातून कामे सुरू करण्यात येतील, असे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले.
कोण काय म्हणाले
महानगरपालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ठेवलेली जागा कमी पडणार असून, ही जागा कमीत कमी ५०० ते ७०० एकरपेक्षा अधिक असावी. या प्रमुख मागणीसह सर्व सुविधा या प्रशासनाकडून मिळाव्यात. नाशिकचा कुंभमेळा हा अधिक चांगला आणि दर्जेदार व्हावा, यासाठी म्हणून तिन्ही आखाड्यांचे पूर्णपणे सहकार्य राहील. पण, त्यासाठी प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेतली गेली पाहिजे. -भक्ती चरणदास महाराज, आखाडा परिषदेचे प्रवक्ते
या कुंभमेळ्याचा आदर्श घेऊन सातत्याने उज्जैन, हरिद्वार या ठिकाणी जो कुंभमेळा होतो, त्यापुढे होत असणारा प्रयारागराजचा कुंभमेळा लक्षात घेता आपल्या कुंभमेळ्याला खूप महत्त्व असते, त्या दृष्टिकोनातून नियोजन केले गेले पाहिजे. -महंत सुधीर दास महाराज, निर्मोही आखाडा
प्रशासनातर्फे आखाड्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येतात. पण, वारकरी संप्रदायाच्यावतीने विविध राज्यांतून येणाऱ्या खालशांनाही त्या प्रकारच्या सुविधा द्याव्यात, ही आमची प्रमुख मागणी आहे. -डॉ. रामकृष्णदास लहवितकर, वारकरी निर्मोही आखाडा