नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याला चार महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाही प्रशासनाकडून सिंहस्थाअंतर्गत कामांचा पाठपुरावा केला जात नाही. याशिवाय तपोवनात उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, या कामांचा दर्जा न सुधारल्यास तसेच गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी गंभीरपणे दखल न घेतल्यास शाहीस्नानावर साधू-महंत बहिष्कार टाकतील, अशी माहिती महंत नरेंद्र महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाशिकला भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची नरेंद्र महाराज यांनी दुपारी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. साधुग्राममध्ये उभारण्यात येणाऱ्या शौचालयांची भांडी व्यवस्थित नाहीत, तसेच भंगारमधील पत्रे वापरले आहेत. शासनाकडून निधी आला असला तरी त्याचा व्यवस्थित विनियोग केला जात नाही. याशिवाय सिंहस्थात सुरक्षितता म्हणून साधुग्राम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोदावरी नदीपात्राची स्वच्छता करणे गरजेचे आहे. नदीपात्र स्वच्छतेची जबाबदारी ही साधू-महंत तसेच नागरिकांची आणि प्रशासनाचीदेखील आहे; मात्र प्रशासनाकडून नदीपात्र स्वच्छतेसाठी गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने आमच्या संप्रदायामार्फत नदीपात्र स्वच्छतेचे काम करून नागरिकांत जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. साधुग्रामची जागा सिंहस्थासाठी अपुरी पडणार आहे. प्रशासनाने घाट विस्तारीकरण केले; मात्र त्याचा उपयोग भाविक कितपत करतील हे सांगता येणार नाही, असेही त्यांनी शेवटी सांगितले. लक्ष्मीनारायण मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेला महंत रामस्नेहीदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, महंत राजारामदास महाराज आदि उपस्थित होते.
शाहीस्नानावर साधू-महंत बहिष्कार टाकतील,
By admin | Published: April 17, 2015 1:17 AM