त्र्यंबकेश्वर : अलाहाबाद, उज्जैन आणि हरिद्वार येथे सर्व व्यवस्था केली जात असताना त्र्यंबकेश्वरलाच आम्ही अन्न, निवाऱ्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित का आहोत, असा संतप्त सवाल करीत प्रशासनाने आमची दखल घ्यावी, अशी मागणी साधूंनी केली आहे.उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आदि ठिकाणांहून २५ ते ३० संन्यासी येथे दाखल झाले असून, ते कुठल्याही आखाड्यांशी संलग्न नसल्याने त्यांच्या अन्न-निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या ते रिंगरोडवरील समाधी परिसरात जागा मिळेल तेथे राहात असून, गावातील पुरोहितांकडे जाऊन दूध, नाष्टा, जेवण आदि घेत आहेत.साधुग्राममध्ये व्यवस्था केली नसल्याने, गावापासून ते खूप लांब असल्याने तेथे वारा-पाऊस यापासून संरक्षण करणारी कोणतीही व्यवस्था नसल्याने आणि परिसरात एकही अन्नछत्र अद्याप सुरू झालेले नसल्याने तेथे रहायचे कसे? असा प्रश्न साधूंनी उपस्थित केला आहे.आपण शंकराचार्य यांच्या अग्नीमठाशी संलग्न असून, गुरू रामू आश्रम यांच्यासह आठ दिवसांपासून येथे अन्न व निवाऱ्याचा शोध घेत आहोत, असे उत्तर प्रदेशमधील सीतापूर जिल्ह्यातील निरसारम येथील ब्रह्माआश्रम, रमेशआश्रम, गिरीजाश्रम यांनी सांगितले.कुठलीही व्यवस्था नसल्याने त्याचा शोध घेण्यातच आपला जास्त वेळ जात असल्याचे या साधूंनी सांगितले. त्यामुळे सकाळपासून पूजा, पाठ, गीतांजली, रामायण यांचे पारायण, जप, तप आदि करायला वेळ पुरेसा मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी केली. (प्रतिनिधी)
गैरसोयींमुळे साधूंनी व्यक्त केली नाराजी
By admin | Published: August 04, 2015 10:48 PM