नाशिक : पावसाच्या संततधारेने जिह्यातील सहा मध्यम साठ्याच्या धरणांमध्ये शंभर टक्के पाणी साठा झाला असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी आठ धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नद्या, नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठच्या रहिवाशांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात १७ मध्यम पाणीसाठ्याचे तर ७ मोठी धरणे असून, गेल्या वर्षी जुलैअखेर याच धरणांमध्ये ४२ टक्के इतकेच पाणी साठले होते. यंदा मात्र ४५८३८ दशलक्ष घनफूट म्हणजेच ७० टक्के पाणी साठा झाला असून, गेल्या अनेक वर्षांचे विक्रम या निमित्ताने मोडीत निघाले आहेत. त्यातही गेल्या आठवड्यात दारणा, गंगापूर, कादवा, पालखेड या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्णात पडलेल्या पावसाचे प्रमाण पाहता यंदा पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनाही प्रश्न जवळपास जुलैमध्ये सुटल्यात जमा झाला आहे.इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, नाशिक या तालुक्यात सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर व हरणबारी ही सहा धरणे शंभर टक्के भरली असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात आहे. अन्य धरणांनीही सरासरी गाठण्यास सुरुवात केल्यामुळे गंगापूर, दारणा, कडवा, भोजापूर, आळंदी, वालदेवी, भावली व नांदूरमधमेश्वर या आठ धरणांमधून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी, कादवा, दारणा नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
सहा धरणे शंभर टक्के भरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 1:29 AM