नाशिकरोड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जगदिश पवार यांचा पिंपळगाव खांब येथे विविध कार्यकारी सोसायटी आणि ग्रामस्थांतर्फे कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष राजाराम जाधव व शिवाजी चुंबळे यांच्या हस्ते जगदीश पवार यांचा सत्कार करण्यात आला.
अनेकांना केली मदत
नाशिकरोड : कोरोनाकाळात नगरसेवक जगदीश पवार यांनी जीवाची पर्वा न करता अनेक कोरोना रुग्णांना उपचारासाठी मदत केली. पिंपळगाव खांब गावातील ते भूमिपुत्र म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. करोना योद्धा म्हणून आजवर अनेक संस्थांनी सन्मान केला. परंतु, गावातील भूमिपुत्र म्हणून झालेला गौरव विशेष असून त्यांचे मोठे समाधान वाटत आहे. अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
खड्डा बुजविण्याची मागणी
नाशिक : जुने नाशिक भागातील कथडा परिसरात खोदलेल्या खड्ड्यांमध्ये गटारीचे पाणी साचून डासांचा प्रार्दुभाव वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी अनेक दुचाकीस्वारांचा अपघात होऊन ते जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. खड्डा त्वरित बुजविण्याची मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांच्या परिसरात शाळा
नाशिक : कोरोनामुळे अद्याप शाळा सुरू करण्याबाबत निर्णय होत नसल्याने काही खासगी संस्थांच्या शाळांनी थेट विद्यार्थ्यांच्या परिसरात जाऊन मिळेल तेथे मोकळ्या जागेत वर्ग भरविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमास पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
खतविक्री दुकानांत गर्दी
नाशिक : ग्रामीण भागात पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची खत खरेदीची लगबग सुरू झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधी पेरण्या केल्या आहेत त्यांची पीक आता तरारली असून पिकांची वाढ होण्यासाठी खत टाकणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांची खतविक्रेत्यांच्या दुकानांत गर्दी होऊ लागली आहे.
दूषित पाण्यामुळे संताप
नाशिक : शहरातील काही भागांत दूषित पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सिडको, जुने नाशिक भागातील नागरिकांमध्ये यामुळे संताप व्यक्त केला जात असून महापालिकेने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.