वाडीवऱ्हे : साहित्य संमेलनाची चळवळ ही शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातदेखील रुजावी. त्यासाठी इगतपुरी सारख्या ग्रामीण भागात कुसुमाग्रजांच्या प्रेरणेतून पुंजाजी मालुंजकर आणि सहकारी हे सलग २२ वर्षे साहित्य संमेलन भरवत असून खरोखर हे कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी काढले.
इगतपुरी तालुका साहित्य मंडळाच्या वतीने कर्मवीर पुंजबाबा गोवर्धने महविद्यालयात आयोजित २२ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन जातेगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी साहित्य चळवळ अशीच सुरु राहावी अशा शुभेच्छा देत सर्व सहित्यिकांना ९४ व्या साहित्य संमेलनाचे निमंत्रक म्हणून निमंत्रण दिले. ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांनी माणसाने माणसाजवळ आपुलकीने जावे हे साहित्य संस्कृतीचे मूलतत्व आहे. सर्व भिंती तोडून साहित्य निर्माण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांनी सांगितले, इथल्या मातीत या साहित्य संमेलनाच्या रूपाने तुकाराम धांडे सारखे कवी निर्माण झाले आहेत. यापुढेही आणखी साहित्यिक निर्माण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रथम सत्राचे अध्यक्ष भाऊसाहेब खातळे यांनी संस्कृती जपण्याचे काम सहित्यसंमेलन करत आले आहे. ते असेच अविरत सुरु राहिल यासाठी सतत मद्त करू अशी ग्वाही दिली. यावेळी प्रशांत पाटिल, कवी प्रकाश होळकर, प्राचार्य भाबड यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी टाळ मृदुंगांच्या गजरात, लेझमच्या तालात ग्रंथदिंडीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. २६/११ च्या हल्यात शहीद झालेले जवान,निष्पाप नागरिक तसेच दिवंगत साहित्यिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व्यासपीठावर आमदार हिरामण खोसकर, विवेक उगलमुगले, तुकाराम धांडे, विलास गोवर्धने, वैशाली आडके,सुभाष सबनीस, अलका दराडे, प्रवीण जोधळे, प्रा.डॉ. पी.आर.भाबड, मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर, नरेंद्र पाटिल,अलका कुलकर्णी, प्रा. आशा पाटील, बाळासाहेब धुमाळ आदि उपस्थित होते. ॲड. ज्ञानेश्वर गुळवे, प्रा. देवीदास गिरी, ग्रंथमित्र बाळासाहेब पलटने यांनी सूत्रसंचालन केले.
इन्फो
परिसंवादांचे आयोजन
द्वितीय सत्रांत ‘ग्रामीण साहित्य संधी आणि आव्हाने’ तसेच ‘सहित्यातून व्यक्त होणारी स्त्री’ या विषयावर परिसंवाद झाला. तर संत साहित्यातील चिरंतन मूल्य यावर व्याख्यान झाले. शेवटी निमंत्रित कवींचे कविसंमेलन पार पडले. यावेळी मुकुंद ताकाटे, राजेन्द्र सोमवंशी, प्रशांत केंदळे ,माणिकराव गोडसे या कवींनी सहभाग नोंदवला. शनिवारी (दि.२७) अध्यक्षीय भाषण आणि खुले कविसंमेलन होणार आहे.