सिन्नर : गुजरातहून शिर्डीकडे पायी निघालेल्या दिंडीतील पदयात्रेकरुंना खासगी आराम बसने धडक दिल्याने एकजण ठार झाला तर एक जखमी झाला. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी शिवारात बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. जखमी पदयात्रेकरुला अधिक उपचारासाठी शिर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गोईमा (गुजरात) येथील साईभक्तांची पायी दिंडी २ डिसेंबर रोजी निघाली होती. या पायी दिंडींतील पदयात्रेकरुंचा मंगळवारी रात्रीचा मुक्काम पांगरी शिवारातील साई पालखी निवाºयात होता. बुधवारी पहाटे साईभक्त उठून शिर्डीच्या दिशेने निघाले होते. याचवेळी सिन्नरकडून शिर्डीच्या दिशेने जाणाºया खासगी आराम बसने (क्र. एम. एच. ०४ एफ. के. १८०) साई पदयात्रेकरुंना पाठीमागून धडक दिली. या अपघातात प्रफुल्लभाई बालूभाई प्रजापती (३६) रा. पार्डी जि. बलसाड (गुजरात) व बुध्दविलास भोला वर्मा (३०) गंभीर जखमी झाले. जखमींना शिर्डी येथे रुग्णालयात घेवून जात असतांना प्रफुल्लभाई प्रजापती यांचे निधन झाले. तर बुध्दविलास वर्मा यास शिर्डी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मृत प्रफुल्लभाई यांचे शिर्डी येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह पार्डी कडे रवाना करण्यात आला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात खासगी बस चालक सुभाष देवराम केदार (बीड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुख्तार सय्यद अधिक तपास करीत आहेत.
खासगी बसच्या धडकेने साई पदयात्रेकरु ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 4:53 PM