श्याम बागुल‘मी पुन्हा येईन’ अशी दर्पयुक्त घोषणा वारंवार करणे व विरोधकांनी ‘भुजबळ आता संपले’ अशी गेल्या पाच वर्षापासून आवई उठविणे या दोन्ही घटनांचा म्हटला तर परस्पर संबंध जोडता येईल. ‘मी पुन्हा येईन’असा दुर्दम्य आशावाद बाळगूनही पदरी निराशा पडावी अथवा नियतीने सूड उगवत सत्तेपासून दूर सारावे. दुसरीकडे ‘संपले’ म्हणवून हिणवले गेल्यावरही सहजगत्या सत्तेवर बसणे हा परस्पर विरोधाभास असाच घडू शकत नाही. त्यामागे छगन भुजबळ नावाचा बंडखोर, आक्रमक व अभ्यासू नेत्याने विधानसभा निवडणूकीच निकाल पुर्ण जाहीर होण्याअगोदर सर्वात प्रथम ‘राजकारणात कधीही काहीही होऊ शकते’ अशी व्यक्त केलेली प्रतिक्रीया बरेच काही सांगून जाते. भुजबळ यांनी केलेले वक्तव्य व त्यांनतर अवघ्या महिनाभरातील राजकीय नाट्यात राष्टÑवादीने शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी उद्युक्त करणे या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी नक्कीच काही तरी संबंध असावा अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे. महाराष्टÑ सदन घोटाळ्यात भुजबळ यांनी अडीच वर्ष तुरूंगात घातले त्यावरून स्वकीयांबरोबरच विरोधकांनीही भुजबळ संपल्याची उठविलेली आवई पाहता, त्यात भुजबळ यांच्या विषयी असलेली आसूया व त्यांच्यामुळे आपले राजकीय स्थान डळमळीत होत असलेली भितीच अधिक होती. भुजबळ यांचे देशभरातील ओबीसी संघटनाच्या माध्यमातून वाढलेले वर्चस्व, बाळासाहेब ठाकरे व शरद पवार या महाराष्टÑातील अत्युच्च परंतु भिन्न विचारसरणीच्या उत्तुंग व्यक्तीमत्वाबरोबर अडीच अडीच दशके घालविल्याने भुजबळ यांच्या लोकप्रियतेने उठलेले पोटशूळच अधिक होते.
राजकीय कारकिर्दीला सुरूवात केल्यानंतर विधीमंडळात शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणवून भुजबळ यांनी तत्कालीन कॉँग्रेस सरकारला सळो की पळो करून सोडण्याची घेतलेली भूमिका व सेनेशी झालेल्या मतभेदानंतर कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माझगावमधून स्वत:च्या पराभवाबरोबरच पक्षांतर केलेल्या साथीदारांचाही पराभव पचविणाऱ्या भुजबळ यांनी मात्र दुस-याच पंचवार्षिकला पराभवाचा वचपा काढत विधीमंडळात कॉँग्रेसकडून दमदार एंट्री करून सेनेला आव्हान दिले. सुरूवातीपासूनच लढवय्ये व येणा-या परिस्थितीला, आव्हानांना सरळ सरळ सामोरे जाण्याची तयारी ठेवणा-या भुजबळ यांनी एकट्याने सेनेला अंगावर घेतले. त्यामुळे ज्या मुशीत ते तयार झाले व सध्या ज्या मार्गावरून त्यांची वाटचाल सुरू आहे ते पाहता, निव्वल अडीच वर्षाच्या तुरूंगवासाने भुजबळ, संपले असा समज करून घेणाऱ्यांची तर कीव करावी तितकी कमीच आहे.
देशाच्या राजकारणावर आपली वेगळी छाप व पकड निर्माण करणा-या शरद पवार यांचे शागिर्द म्हणून राष्टÑवादीच्या पहिल्या फळीतील नेते असलेल्या भुजबळ यांच्याविषयी असूया विरोधकांना असणे एक वेळ समजू शकते, परंतु देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या प्रचार सभेत भुजबळ यांच्या राजकीय ताकदीचा आर्वजून उल्लेख करावा व ‘भुजबल’ नही चलेंगा’ अशी गर्भीत धमकी द्यावी यातच भुजबळ यांच्या भुजातील बळाची प्रचिती खरे तर भुजबळ विरोधकांना यावयास हवी होती. परंतु भुजबळ यांना पुरेसे समजून घेण्याचा राजकीय नादानपणा करणा-यांनी नाशिकपासून मुंबईपर्यंत भुजबळ यांच्या विरोधात जो काही अपप्रचार केला त्यातून भुजबळ यांचे महत्व अधिक वाढले. तुरूंगातून सुटल्यावर प्रकृतीने व राजकीय ताकदीने भुजबळ क्षीण झाले असा अंदाज राजकीय जाणकारांनी बांधलेला असताना भुजबळ यांनी सत्ताधाºयांच्या विरोधात त्वेषेने रान पेटविले. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या निकालातून दिसून आला. शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये कायमच अव्वलस्थानी राहिलेल्या भुजबळ यांनी आपला राजकीय मुत्सद्दीपणा दाखवित अनेक अडथळे लिलया पार केले. भविष्यातील राजकीय घडामोडींचा अचूक ठाव घेवूनच निवडणूक निकालानंतर ‘राजकारणात काहीही होऊ शकते’ हे त्यांनी केलेले सूचक वक्तव्यच त्यांना सत्तेच्या दारापर्यंत घेवून गेले. मंत्रीपद मिळाल्यानंतर ‘आयुष्य सिनेमासारखा वाटला’ अशी प्रतिक्रीया व्यक्त करणा-या भुजबळ यांनी ख-या खु-या चित्रपटाची निर्मिती करून नायकाचीही एकेकाळी भूमिका वठविली होती हे विसरून चालणार नाही. त्यांच्या राजकीय वाटचालीवर नजिकच्या काळात ‘मी पुन्हा आलो’ असा चित्रपट निघाला नाही तर नवलच !