मालेगाव : शहर व तालुक्यात तीन ते चार दिवसानंतर अक्षय्य तृतीयेच्या रात्री पावसाचे आगमन झाले. यात सर्वात जास्त पावसाची नोंद सायने मंडळात ३४ मि.मी.ची झाली.मे हिटच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाचे आगमन झाले आहे. या वळवाच्या पावसाने आतापर्यंत लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील अनेक गावात पावसाने हजेरी लावली. यावेळी अजंग-वडेल परिसरासह चिंचावड भागात गारा पडल्या होत्या. त्यामुळे टरबूज, कांदा पिकासह कैऱ्या, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सलग पावसाने हुलकावणी देण्याचे काम केले असले तरी जिल्ह्यातील इतर भागात व कसमादेत पाऊस कोसळत होता. त्यात तालुक्यात पावसाचे वातावरण निर्माण होत होते; मात्र न पडताच पाऊस परत जात होता. सोमवारी रात्री मात्र पावसाने अक्षय्य तृतीयेच्या सणाच्या दिवशी हजेरी लावली. यात शहरासह सायने, झोडगे, करंजगव्हाण आदि भागाचा समावेश आहे. या दहा मंडळापैकी झोडगेत ५ मि.मी. मालेगाव शहरात २ मि.मी. तर, करंजगव्हाण मंडळात १ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शहरातील कॅम्प भागात पडलेल्या पावसाने येथील पोलीस कवायत मैदानावर आखाजीनिमित्त आलेल्या आनंद मेळाव्याला पहिल्याच दिवशी गालबोट लागले. सायंकाळी सातपासून पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनीघराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे या मेळाव्यात नगण्य असलेली उपस्थिती रात्री साडेआठच्या सुमारास नाहीशी झाली होती. त्यामुळे मेळाव्याचे आर्थिक नुकसान झाले. जिल्ह्यात पडणाऱ्या या बेमोसमी पावसामुळे शहरातील तापमानात घट झाली आहे. हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. (प्रतिनिधी)
सायने येथे विक्रमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2016 10:20 PM