इंदिरानगर : साईनाथनगर येथे अखेर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली मात्र सिग्नल केवळ नाममात्र ठरत असून, वाहनधारक सिग्नलचे नियम पाळत नसल्याने या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. साईनाथनगर चौफुली अत्यंत वर्दळीची चौफुली बनली आहे, मुंबर्ई महामार्ग, नाशिकरोड आणि इंदिरानगरकडे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची वर्दळ लक्षात घेता या चौकात वाहनांची गर्दी होत असते. याचा चौकात अपघात घडल्यानंतर येथे सिग्नल बसविण्यात यावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर नागरिकांची भावना लक्षात घेत या मार्गावर गतिरोधक टाकण्यात आले होते. या चौकातील वाढती वाहनांची वर्दळ पाहता तात्पुरत्या स्वरूपात गतिरोधक टाकूनही अपघाताचे प्रमाण कमी होत नसल्याने पुन्हा एकदा सिग्नल यंत्रणा बसविण्याबाबत नागरिकांनी आवाज उठविला होता. त्यामुळे अखेर पालिकेने मागणी मान्य करीत सिग्नल यंत्रणेसाठी साहित्य खरेदी केली सुमारे आठ महिन्यांपासून आणलेले साहित्य हेत सिटी उद्यानात पडून होते. त्यानंतर आलेल्या सिंहस्थाचे निमित्त लाभले आणि सिग्नल बसविण्यात आले, परंतु त्यानंतरही पंचवीस दिवस उलटूनही सिग्नलचे उद्घाटन होऊ शकलेले नव्हते. आता सिग्नल सुरू झाला असला तरी प्रत्यक्षात या सिग्नलचे पालनच होत नसल्याचे चित्र आहे. या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नियुक्ती व्हावी अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर) वाहनधारकांची उदासीनतासाईनाथनगर चौफुली नेहमीच धोकेदायक ठरली आहे. वाहने समोरासमोर आल्याने अपघाताचे प्रकार वाढले आहेत. त्यातच सुसाट वेगाने धावणाऱ्या चारचाकी गाड्यांमुळे तर हा चौक अधिकच धोकेदायक बनला आहे. महामार्गावर अनेक बिअरबार असल्याने मद्यपी रात्रीच्या सुमारास या चौकातून सुसाट वेगाने वाहने चालवितात. दिवसाही असे प्रकार दृष्टीस पडतात. त्यामुळे या चौकात कायमस्वरुपी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी, अशी मागणी असून कित्येकदा पोलीस केवळ वसुलीचे काम करतात, त्यांनी वाहतूक नियमन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
साईनाथनगर सिग्नल नावालाच
By admin | Published: October 31, 2015 12:08 AM