नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावापासून ५०० मीटर अंतरावर होत असलेल्या भरावा पुलाला शिंदे ग्रामस्थांनी विरोध दर्शवित सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. भराव पुलामुळे गावाच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने भराव ऐवजी उड्डाणपूल अथवा सरळ रस्ता ठेवावा, अशी मागणी करीत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नाशिक-पुणे महामार्गाचे रुंदीकरण सुरू असून, या मार्गावर श्ािंदेपासून जवळच भरावा पूल तयार केला जात आहे. या पुलामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गावाच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी पुलास विरोध दर्शविला आहे. सकाळी ८ वाजता सरपंच माधुरी तुंगार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थ एकत्र आले होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलानास सुरुवात करण्यात आली.या पुलामुळे दररोज नाशिकरोडच्या बाजारपेठेत जाणारे शेतकरी, कामगार, तसेच शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, कामगार वर्ग यांना या पुलामुळे त्रास होणार आहे. भराव्यामुळे गाव दुभंगले जाणार आहे. शिवाय सुरक्षिततेचादेखील प्रश्न निर्माण होणार आहे. याचा विचार करून भरावा पुलाचे काम बंद करावे, अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. याप्रसंगी ग्रामस्थांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.ग्रामस्थांचा आक्षेपया मार्गावर शिंदे ग्रामपंचायत कार्यालय, व्यायामशाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, माध्यमिक विद्यालय, कॉलेज, प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी तसेच मंडल कार्यालय आहेत. या ठिकाणी रोजच नागरिकांची वर्दळ असते. नागरिकांना कामानिमित्त सतत ये-जा करावी लागते. या भरावा पुलामुळे सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शिंदे गाव येथील भरावा पुलाला ग्रामस्थांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 1:20 AM