सिन्नर : विघ्नहर्ता गणरायाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागणाºया विविध प्रकारच्या सजावटीच्या आकर्षक साहित्याने सिन्नर शहरातील बाजारपेठ सजली आहे. बाजारपेठेत गणरायाची विविध रूपे आकर्षक मूर्तीच्या स्वरूपात भक्तांसाठी उपलब्ध आहेत. पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणरायाच्या मूर्तींनाही बाजारपेठेत मागणी असल्याचे दिसून येते.लाडक्या गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा, मोत्यांचे हार, थर्मोकोलचे मखर, पर्यावरणपूरक कागदी मखर, छोटछोट्या दिव्यांच्या माळा, काचेची व प्लॅस्टिकची फुले, हिटलॉन शीट, क्रिस्टल माळा, चायनीज माळा व फुले, फुलांचे विविध एक ना अनेक नवनवीन प्रकार बाजारपेठेत आले आहेत. बाजारपेठेत विविध रूपातील गणरायाच्या मूर्ती विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये सध्या चित्रपट, मालिकांतील पात्रांच्या स्वरूपातील मूर्तीचा ट्रेंड सर्वाधिक दिसून येत आहे. गणेशाच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. प्रत्येकजण आपल्या गणरायाची मूर्ती ही सुरेख, सर्वांपेक्षा वेगळी असावी यासाठी अनेक स्टॉल्सवर आगमनाच्या दिवशी घाई गडबड नको म्हणून दोन दिवस आधीच बुकिंगसाठी जात असतो. नागरिकांची आवड लक्षात घेऊन मूर्तिकार आणि विक्रेतेही त्याप्रमाणे मूर्ती विक्रीसाठी आवर्जून स्टॉलमध्ये ठेवतात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी वेगवेगळ्या रंगसंगतीतील लहान-मोठे मखर विक्रीस आले आहेत. त्यामध्ये चौरंग, मूषक वाहक रथ, सिंहासन, कमळ यांसारख्या मखरांना विशेष मागणी आहे. याशिवाय छोटी-मोठी कलात्मक झाडे, रंगीबेरंगी फुले, प्लॅस्टिक फुलांचे हार, तोरण यांसह विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तूही मुबलक प्रमाणात विक्रीस आल्या आहेत. घरोघरी गणेश आगमनाची तयारी सुरू तर आहेच, पण यावर्षी आरास कशी आकर्षक करता येईल याबाबत अनेक तरुण मंडळांमधूनही मंडप उभारणी तसेच सजावटीची तयारी सुरु असल्याचे चित्र आहे. थर्मोकोलची मखर भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.
गणेशोत्सवासाठी सजली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:19 AM