इगतपुरी : निसर्गाने नटलेल्या व सौंदर्यसंपदा लाभलेल्या इगतपुरी शहराचा पर्यटन माध्यमातून विकास होण्यासाठी नगरपरिषदेच्या सभागृहात पर्यटन विकास समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पर्यटन समितीचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष नईम खान, उपाध्यक्ष उमेश कस्तुरे, मुख्याधिकारी पंकज गोसावी यांच्या उपस्थित ऑनलाइन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट साहेबराव पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी ग्रीन इगतपुरीची संकल्पना, मुलांना खेळण्यासाठी उद्यान तसेच ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून नाना-नानी पार्क शहराच्या प्रत्येक वाॅर्डात सुशोभीकरण, पर्यटन स्थळांवर आधुनिक पद्धतीचे सुरक्षित सेल्फी पॉइंट विकसित करण्याचे सुचविण्यात आले.
वॉर्डनिहाय गार्डन तसेच संभाव्य पर्यटनस्थळ नगर परिषद हद्दीतील बारा बंगला येथील तलाव गिरणारे येथील तलाव, रेल्वे तलाव अशा ठिकाणी बोटिंगचा व्यवसाय सुरू करता येईल व पर्यटनास चालना मिळेल.
सदरची उद्याने विकसित करण्यास आपण बांधा, वापरा, हस्तांतरण बीओटी तत्त्वानेदेखील विकसित करू शकतो, असे पर्यटन समितीच्या वतीने बैठकीत सांगण्यात आले.
इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणे शक्य असतील, अशा जागांचे सर्वेक्षण इगतपुरी नगरपरिषद कर्मचाऱ्यांमार्फत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. दोन महिन्यांच्या आत याचा सविस्तर अहवाल तयार करून नगरपरिषद हद्दीतील पर्यटन आणि विकास साधण्यासाठी सहा महिन्याच्या आत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सादर करणार आहे, असे नईम खान यांनी बैठकीत सांगितले.
(०९ इगतपुरी)
यावेळी पर्यटन विकास समिती अध्यक्ष नईम खान, उपाध्यक्ष उमेश कस्तुरे, नगरसेवक युवराज भोंडवे, सुनील रोकडे, आरती कर्पे, साहेबराव पवार, संपत डावखर, गजानन कदम, मीना खातळे, उज्ज्वला जगदाळे आदी कर्मचारी वृंद ऑनलाइन उपस्थित होता.
चौकट...
नगरपरिषद, फॉरेस्ट डिपार्टमेंट, रेल्वे यांच्या संगनमताने अहवाल सादर करून इगतपुरीचा पर्यटन विकास केला जाणार आहे. इगतपुरी नगरपरिषद कार्यालयात पर्यटन समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.