नाशिक : जीवनावश्यक सेवा म्हणून शहरातील किराणा दुकानदारांना सकाळी ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवता येत असताना दुसरीकडे मात्र किरकोळ कारणांवरून पोलीस दंडाच्या पावत्या फाडत असल्याने दुकानदार त्रस्त झाले आहेत. सरकारवाडा पोलिसांकडून अकारण अडवणूक होत असल्याचा आरोप करीत नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेच्यावतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घालण्यात आले.
कोरोनाचे संकट गेल्या वर्षापासून आले. त्यावेळीही संकट काळात जीवनावश्यक म्हणून किराणा व्यापारी व्यवसाय करून नागरिकांची दैनंदिन गरज भागवित आहेत. आता राज्य शासनाने सकाळी अकरा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची वेळ दिली असून अशावेळी देखील दुकानदार जीव धाेक्यात घालून व्यवसाय करीत आहेत. मात्र, पोलीस आणि महापालिकेच्या चार ते पाच अधिकाऱ्यांचे पथक वेळेच्या मर्यादेत दुकाने सुरू असतानादेखील तेथे येऊन विविध कारणावरून वाद करतात. तसेच किरकोळ कारणावरून नियमभंग असल्याचे सांगून दंड वसूल करतात. तसेच दुकाने सील करण्याची धमकी देतात अशी तक्रार संघटनेने जिल्हाधिकारी सूरज मांढरे तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली होती. तसेच या कारवायांच्या निषेधार्थ दुकाने बंद करण्याचा इशारा दिला होता.
रविवारी (दि.२) यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या समवेत झुूम मिटींग घेण्यात आली. त्यांनी यंत्रणा चुकीच्या पद्धतीने कारवाई करणार नाही याची दक्षता घेण्यात येईल तसेच दुकानदारांनीही नियमांचे पालन करावे आणि दुकाने बंद करून टाेकाचा निर्णय घेऊ नये असे आवाहन केले. चर्चेत प्रफुल्ल संचेती, राकेश भंडारी,मनोज वडेरा, कल्पेश बेदमुथा, महेंद्र पटेल, शेखर दशपुत्रे, नेमीचंद केाचर, राजनशेठ दलवानी आदी सहभागी झाले होते.