गोदावरी नदीचे उगमस्थान असलेला ब्रह्मगिरी सध्या पोखरण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी डोंगर फोडतानाच रिसोर्ट देखील तयार करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात गोदावरी नदी ज्या सहा राज्यातून वाहत जाते तेथेही ब्रह्मगिरीच्या हानीचा परिणाम होणार असल्याने यासंदर्भात सहाही राज्यातील पर्यावरण प्रेमी एकत्र आले आहेत. राजेंद्रसिंह यांनी मंगळवारी (दि.१) माध्यमांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आधी राज्य सरकारला निवेदन देऊन त्यांच्या घटनात्मक जबाबदारीची जाणीव करून दिली जाईल असे नमूद केले हेाते.
त्यानुसार तरूण भारत संघाचे अध्यक्ष या नात्याने राजेंद्रसिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. ब्रह्मगिरी हे पहाडी तीर्थ क्षेत्र आहे. मात्र हे पहाडी तीर्थ क्षेत्र काही लोक नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. नदी संरक्षण करणे हे राज्य सरकारचे घटनात्मक कर्तव्य आहे. त्यामुळे ब्रह्मगिरीत होणारे खेादकाम, ब्लास्टिंग सारखे विनाशकारी कार्य त्वरित थांबवावे अशी मागणी त्यांनी केली आहे.