त्र्यंबकेश्वर : येथे कोरोनामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून कोलमडलेले अर्थकारण पूर्वपदावर आणण्यासाठी परिसरातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यासह धार्मिक विधी सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.कोरोनामुळे त्र्यंबकेश्वरसह परिसरातील मंदिरे खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या काही महिन्यांपासून दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या नियम व अटींवर मंदिर खुले करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. मंदिरे सुरू झाल्यास परिसरातील गाळात रुतलेले अर्थचक्र खुले केल्यास सर्व समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, अशा मागणीचे निवेदन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांना त्र्यंबकेश्वर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आले.निवेदन देतेवेळी आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, त्र्यंबकेश्वर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनोज काण्णव, शहर पुरोहित संघाचे किशोरशास्री पाटणकर, राहुल फडके, लोकेशशास्त्री अकोलकर, नगरसेवक समीर पाटणकर आदी उपस्थित होते.त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रात अनलॉक- २ काळात मंदिरांमध्ये सर्व धार्मिक विधी नारायण नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्प योग, दशक्रि या विधी, मंदिर अभिषेक आदी पूजाविधी सुरू करण्यास परवानगी मिळाल्यास अनेक घटकांना न्याय मिळेल, असा विश्वास निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.
त्र्यंबक परिसरातील मंदिरे खुले करण्यासाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 10:44 PM