नाशिक : नाशिक-पुणे हायवे व नाशिक-मुंबई महामार्ग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच शिंदे व घोटी टोलमध्ये असलेली सदोष यंत्रणा याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आलेली आहेत. वाहतूकदारांसह सामान्य नागरिकांना रस्त्याने जर सुविधा मिळत नसतील तर टोल का भरावा, असा प्रश्न वाहतूकदारांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत नाही, तोपर्यंत टोल बंद करावा, अशी मागणी नाशिक डिस्ट्रीक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना करण्यात आली आहे.
याबाबत नाशिक डिस्ट्रीक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागमंत्री अशोक चव्हाण, अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज आहिरे, नॅशनल हायवे व्यवस्थापक, टोल व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे. नाशिक -पुणे हायवेवरील शिंदे पळसे व नाशिक मुंबई हायवेवरील घोटी टोल नाक्यावर वाहतूकदारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या शिंदे, पळसे व घोटी टोल नाक्यावर टोल घेतला जातो त्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. या ठिकाणी व्यवस्थापनाकडून कुठलीही डागडुजी होताना दिसत नाही. आम्ही टोल द्यायला तयार आहोत; मात्र टोल अंकित रोड आणि त्याच्या सर्व सुविधा चांगल्या प्रतीच्या द्याव्यात. जोपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होणार नाही तोपर्यंत टोल घेऊ नये. जर टोल भरण्यास प्रशासनाने बळजबरी केली तर वाहतूकदार व नागरिक रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
इन्फो
असंतोष वाढला
टोलच्या ठिकाणी असलेली फास्टटॅगची सुविधा अत्यंत संथ आणि निष्क्रिय असून या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. परिणामी टोल पास करण्यासाठी वाहनांच्या रांगा लागत असल्याने अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागतो. त्यामुळे वाहतूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. टोल परिसरात क्रेन, रुग्णवाहिका, यू-टर्नला बत्ती, रोडच्या कडेला सफेद पट्टा, स्वच्छतागृह अस्वच्छ याबाबत वारंवार तक्रारी देऊनही यामध्ये कुठल्याही सुधारणा होताना दिसत नसल्याने वाहतूकदारांमधील असंतोष वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.