पेठ : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षक संघटना व पदाधिकाऱ्यांच्या मागणीवरून दि. १ मार्चपासून जि.प. प्राथमिक शाळा सकाळ सत्रास घेण्याचे आदेश दिले असले तरी शाळा सुटल्यानंतर दुपारी दीड वाजता भरउन्हात विद्यार्थ्यांना घरी जावा लागेल. यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी या वेळेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे़दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येत असल्या तरीही मागील वर्षापासून सकाळी शाळा भरवल्या जात आहे. यावर्षी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव करून दि. १ मार्चपासून सकाळ सत्रात शाळा भरवाव्यात, असे आदेश देण्यात आले; मात्र बालकांच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्याचा आधार घेत जिल्हा प्रशासनाने सकाळी साडेसात ते दुपारी दीड अशी वेळ दिली असून, या वेळेत विद्यार्थी कसे शाळेत येतील व दीड वाजता ऐन उन्हात विद्यार्थ्यांना घरी जावे लागणार असल्याने वाडी-वस्त्यांवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी अडचण निर्माण होणार असल्याने शाळेची वेळ सकाळी साडेसात ते साडेअकरा अशी करावी, अशी मागणी शिक्षक व पालकांकडून करण्यात येत आहे़ मात्र जिल्हा प्रशासनाने याबाबत कोणताही निर्णय जाहीर न केल्याने शिक्षकांच्या मनात द्विधापरिस्थिती निर्माण झाली आहे़ (वार्ताहर)
जिल्ह्यात आजपासून सकाळच्या शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2016 10:46 PM